Political atmosphere intensifies ahead of civic elections : महानगरपालिका निवडणुकीत युतीचे राजकारण तापले
Amravati महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना राजकीय पक्षांतील युती आणि आघाडीचे राजकारण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. राज्यातील प्रमुख आघाड्यांमध्ये अद्याप एकमत होत नसल्याचे स्पष्ट चित्र असून, स्थानिक पातळीवर समीकरणे दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीमध्ये सध्या सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. काँग्रेसने काही ठिकाणी ‘एकला चलो’ची भूमिका घेण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक नेतृत्वाला स्वतंत्र ताकदीवर निवडणूक लढवण्याचा विश्वास असून, आघाडीतील समन्वयाचा अभाव यामागे कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, महायुतीमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांमध्येही स्थानिक पातळीवर मतभेद उफाळून आले आहेत. काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे युतीची दारे बंद करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे युती जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी स्वतंत्र लढतीचे चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Sandeep Deshpande : मराठीचा अपमान कराल तर ‘नही बंटोगे, तो भी पिटोगे’
या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजपमध्ये युती होण्याचे संकेत सातत्याने राणा दाम्पत्याकडून दिले जात आहेत. भाजप नेत्या खासदार नवनीत राणा यांनी विविध माध्यमांशी बोलताना युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोबत न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
नवनीत राणा यांनी थेट शब्दांत सांगितले की, “चादर चढवणाऱ्याच्या बाजूला आम्ही नाही.” अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके हे चादर चढवणाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अशा विचारसरणीच्या नेत्यांसोबत युती करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. याआधीही त्यांनी विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या विधानामुळे निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकूणच, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर युती-आघाडीचे राजकारण तापले असून, येत्या काळात आणखी आक्रमक विधाने आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








