petrol-diesel-price-hike-second-time-in-four-days-maharashtra-fuel-crisis-buldhana : अनेक जिल्ह्यांत दर १०९ रुपयांच्या पार, बुलढाण्यात टंचाईने शेतकरी संतप्त
Mumbai : देशभरातील सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा मोठा फटका बसला असून अवघ्या चार दिवसांच्या अंतराने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात तीन रुपये तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा पेट्रोल ९१ पैशांनी आणि डिझेल ९४ पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी यांच्यात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
नव्या दरांनुसार मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०७.५९ रुपयांवर तर डिझेलचा दर ९४.०८ रुपयांवर पोहोचला आहे. पुण्यात पेट्रोल १०७.८६ रुपये आणि डिझेल ९४.४० रुपये इतके झाले आहे. नागपुरात पेट्रोल १०८.०६ रुपये आणि डिझेल ९४.६३ रुपये दराने विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०८.८४ रुपये तर डिझेल ९५.३५ रुपये झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०९ रुपयांच्या पुढे गेले आहेत. गोंदियामध्ये पेट्रोल १०९.५४ रुपये आणि डिझेल ९६.०८ रुपये, तर सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल १०९.५५ रुपये आणि डिझेल ९६.०७ रुपये इतके झाले आहे.
Chandrashekhar bawankule : विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न
दिल्लीमध्ये पेट्रोल ९८.६४ रुपये आणि डिझेल ९१.५८ रुपये झाले असून कोलकातामध्ये पेट्रोल १०९.७० रुपये आणि डिझेल ९६.०७ रुपये दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०४.४९ रुपये आणि डिझेल ९६.११ रुपये इतके झाले आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये झालेल्या या वाढीमुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील तणावामुळे खनिज तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर होत असून कंपन्यांना वाढता तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने इंधन दरांवरील काही आर्थिक भार सर्वसामान्यांवर टाकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत सलग दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईचे गंभीर संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी डिझेलचा तुटवडा कायम असून शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. मान्सूनपूर्व शेतीची कामे अंतिम टप्प्यात असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक भागांमध्ये शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील १६६ पेट्रोल पंपांपैकी केवळ २२ पंपांवरच डिझेल उपलब्ध असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचा नंबर येण्यापूर्वीच डिझेल संपत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Bjp conflict : ‘मेरा नंबर कब आयेगा?’ नागपूर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष
शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.








