व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Neet paper leak : पुण्यातून उघड झाला नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड खेळ!

Neet paper leak : पुण्यातून उघड झाला नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड खेळ!

neet-paper-leak-pune-manisha-havaldar-manisha-mandhare-cbi-investigation-news : फिजिक्स तज्ज्ञ, शिक्षिका आणि ब्युटीशियनच धक्कादायक रॅकेट

Pune : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्यापर्यंत पोहोचले असून या संपूर्ण रॅकेटमध्ये शिक्षण क्षेत्रातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या तपासात मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे, शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे यांच्यातील साखळी उघड झाली आहे. या तिघींनी संगनमताने नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका बाहेर काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

सीबीआयच्या तपासानुसार, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची ओळख एका ब्युटी पार्लरमधून झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मोठ्या गैरव्यवहारात झाल्याचे तपासातून समोर आले आहे. मनीषा वाघमारे ही पालक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधत इच्छुक उमेदवारांना मनीषा मांढरेकडे पाठवत होती. त्यानंतर प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी मोठ्या रकमेची देवाणघेवाण होत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ वादात संजय गायकवाडांना न्यायालयाचा दणका

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून मनीषा हवालदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय प्रक्रियेपर्यंत प्रवेश मिळाला होता. सीबीआयच्या चौकशीत हवालदार यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भौतिकशास्त्राचे प्रश्न मनीषा मांढरे हिला पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले की, लीक झालेले अनेक प्रश्न आणि प्रत्यक्ष नीट परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न जवळपास हुबेहूब जुळत होते.

सीबीआयने या प्रकरणात शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांची कसून चौकशी केली. त्यानंतर मनीषा हवालदार यांचे नाव पुढे आले. त्यानुसार तपास यंत्रणांनी पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेवर छापेमारी करत मनीषा हवालदार यांना अटक केली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्यावर कारवाई झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मनीषा हवालदार यांनी मोठे नियोजन केल्याचे उघड झाले आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, त्यांनी भौतिकशास्त्राच्या प्रश्नसंचाशी संबंधित काही हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्या. तपास यंत्रणांच्या हाती कोणतेही लेखी पुरावे लागू नयेत, यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

Donald trump : अमेरिकेत पुन्हा थरार! व्हाईट हाऊसबाहेर हल्लेखोराचा तुफान गोळीबार

फक्त लेखी पुरावेच नव्हे तर डिजिटल पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट, मेसेज आणि अन्य संवाद डिलीट करण्यात आले होते. विशेष म्हणजे काही प्रश्नसंच पाठवण्यासाठी मनीषा हवालदार यांनी आपल्या पतीच्या मोबाईल फोनचाही वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोबाईलमधून पाठवण्यात आलेले मेसेज आता तपासातील महत्त्वाचा दुवा मानले जात आहेत.

सीबीआय आता डिलीट करण्यात आलेले डिजिटल पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे. मोबाईल डेटा, चॅट हिस्ट्री, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे. या तपासातून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नीटसारख्या देशातील महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील या कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटमुळे शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!