sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-prashant-ambi-court-inquiry-kolhapur-news-marathi : प्रशांत आंबींना धमकीप्रकरणी पोलीस चौकशीचा मार्ग मोकळा
Kolhapur : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या मुद्रण आणि प्रकाशनावरून निर्माण झालेल्या वादात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपांवरून आता पोलिसांना संजय गायकवाड यांची चौकशी करण्यास कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई आणि संभाव्य गुन्हा नोंदवण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 साली लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत करण्यात आल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. या संभाषणात त्यांनी कथितरित्या शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
Donald trump : अमेरिकेत पुन्हा थरार! व्हाईट हाऊसबाहेर हल्लेखोराचा तुफान गोळीबार
या फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली होती. संभाषणात संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. “तुला माहितीये ना गोविंद पानसरे यांचं काय झालं? तुलाही घरात घुसून मारेन, तुझी जीभ छाटेन,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा दावा प्रशांत आंबी यांनी केला होता.
या घटनेनंतर प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. आता कोल्हापूर सत्र न्यायालयाने पोलिसांना आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी दिल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर राजारामपुरी पोलीस आता संजय गायकवाड यांना चौकशीसाठी नोटीस बजावू शकतात. त्यांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर राहावे लागू शकते किंवा लेखी स्वरूपात त्यांचे म्हणणे नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशांत आंबी यांनी दावा केला आहे की, गेल्या महिनाभरात त्यांना शंभरहून अधिक धमकीचे फोन आले आहेत. संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात ते पुन्हा पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Bachchu kadu : “मुख्यमंत्रिपदासाठी आम्हीही घरी जाऊन पाठिंबा दिला होता”
वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाबाबत प्रशांत आंबी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हे पुस्तक कोणत्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी लिहिलेले नाही. पुस्तक आधी वाचावे आणि नंतर प्रतिक्रिया द्यावी, असे त्यांनी संजय गायकवाड यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही धमकी आणि शिवीगाळ सुरूच राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ऐतिहासिक साहित्यावरील प्रतिक्रिया आणि लोकप्रतिनिधींच्या भाषाशैलीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिस चौकशी कोणत्या दिशेने जाते आणि पुढे गुन्हा दाखल होतो का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








