Uddhav Thackeray Shivsena aggressive on NEET paper leak case in Buldhana: भर पावसात केंद्र सरकारविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर; विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध
Buldhana दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) मंगळवारी (दि. २२) बुलढाणा शहरात केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. भर पावसात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, विद्यार्थी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी डफ वाजवत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदवत रास्ता रोको आंदोलन केले.
रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. या वेळी काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक व तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Akash fundkar: कामगारांच्या प्रश्नावर फुंडकर कोंडीत?; सोलापूर आंदोलनाचे पडसाद खामगावात
आंदोलनादरम्यान जयश्री शेळके यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाचा निषेध करत केंद्र सरकारवर टीका केली. विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रा. डी. एस. लहाने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असून ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.








