व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Nitin Gadkari Devendra Fadnavis : गडकरी, फडणविसांच्या ‘होमग्राऊंड’वर पुन्हा येणार सत्ता?

Nitin Gadkari Devendra Fadnavis : गडकरी, फडणविसांच्या ‘होमग्राऊंड’वर पुन्हा येणार सत्ता?

prestige battle for the BJP, while Congress aims for a comeback : महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची, काँग्रेस ‘कमबॅक’च्या प्रयत्नांत

Nagpur नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच उपराजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून आता सर्वांचे लक्ष नागपूर महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या भाजपसमोर चौथ्यांदा विजयाची संधी असून, काँग्रेससाठी ही निवडणूक संघटनात्मक पुनरुज्जीवनाची मानली जात आहे.

नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. नगरपरिषद निवडणुकांतील घवघवीत यशानंतर भाजपमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनपा निवडणुकीसाठीची एकूण रणनीती, प्रभागनिहाय तयारी आणि संभाव्य उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Vanchit Bahujan Aghadi : पहिला डाव वंचितचा, उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपकडून ही निवडणूक ‘विकासाच्या अजेंड्यावर’ लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, रस्ते विकास, स्मार्ट सिटी उपक्रम आणि विविध पायाभूत सुविधांचा दाखला देत भाजप मतदारांसमोर जाण्याच्या तयारीत आहे. १५१ जागांच्या महापालिकेत १२० जागा जिंकण्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असला, तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी वाटप हेच भाजपसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. वरिष्ठ नेत्यांकडून अति आत्मविश्वास टाळत तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, काँग्रेससाठी नागपूर महानगरपालिका निवडणूक नवसंजीवनी देणारी ठरू शकते. नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी यंदा महापालिकेत ‘करिश्मा’ घडवण्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या तुलनेने कडव्या लढतीनंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे.

Local Body Elections : पालिका निवडणुकीत शहराध्यक्षांनाच घरचा रस्ता!

बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अंतर्गत रस्त्यांची खराब अवस्था आणि तुंबणाऱ्या गटारांचे प्रश्न काँग्रेसकडून आक्रमकपणे मांडले जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपविरोधात स्थानिक प्रश्नांवर थेट जनतेशी संवाद साधत काँग्रेस मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिका निवडणूक यंदा चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

error: Content is protected !!