Nitin Gadkari had advised Datta Meghe not to remove photos of Rajiv Gandhi and Sharad Pawar from his home despite changing parties : दत्ताभाऊ भाजपमध्ये आले, पण राजीव गांधी, शरद पवारांचा फोटो घरात कायम होता
Nagpur राजकारणात आजच्या काळात पक्ष बदलणे ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. पक्ष बदलला की विचारधारेसोबतच नेत्यांचे ‘गॉडफादर’ही बदलतात, अगदी निष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी घराचे रंग बदलणारेही अनेकजण आपण पाहतो. मात्र, विदर्भाचे ज्येष्ठ आणि दानशूर नेते स्व. दत्ताभाऊ मेघे याला अपवाद ठरले. ते भाजपात गेल्यानंतरही त्यांच्या घरी आणि कार्यालयात शरद पवार आणि स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमा डौलाने मिरवत राहिल्या. राजकारणापलीकडच्या या निष्ठेचा एक हळवा प्रसंग आज जामठा येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत उलगडला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शोकसभेत गडकरींनी एक आठवण सांगितली. दत्ताभाऊंनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा नितीन गडकरी काही नेत्यांसह त्यांना भेटायला वर्ध्याला गेले होते. त्या वेळी दत्ताभाऊंनी गडकरींना अतिशय प्रांजळपणे विचारले होते की, मी आता भाजपात आलो आहे, तर मला घरातील शरद पवार आणि राजीव गांधी काढावी लागतील का?
त्यावेळी गडकरींनी त्यांना दिलेले उत्तर मनाचा मोठेपणा आणि राजकारणातील निष्ठेचे दर्शन घडवणारे होते. गडकरी म्हणाले, भाऊ, तुम्हाला तुमचे दैवत बदलण्याची काहीच गरज नाही. राजकारण आपल्या जागी आणि निष्ठा आपल्या जागी ठेवा. गडकरींच्या या शब्दांनी दत्ताभाऊंच्या मनातील संभ्रम दूर झाला आणि त्यांनी अखेरपर्यंत आपल्या जुन्या नेत्यांप्रती असलेली कृतज्ञता जपली.
दत्ताभाऊ हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी होते. पवार साहेबांनीच दत्ताभाऊंना घडवले, आमदार नसतानाही त्यांना थेट मंत्री केले. आज मी जे काही आहे आणि माझ्याकडे जे वैभव आहे, ते केवळ पवार साहेबांमुळेच, असे दत्ताभाऊ जाहीरपणे मान्य करायचे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोणाचाही त्यावर विश्वास बसत नव्हता. उलट, दत्ताभाऊ पवारांना सोडूच शकत नाहीत असे दावे केले जात होते. ज्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, तेव्हा पवार साहेब काय म्हणाले? या प्रश्नावर त्यांना रडू कोसळले होते. ही त्यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांची पावती होती.
भाऊंच्या निधनानंतर शरद पवार यांनीही आपल्या या जुन्या सहकाऱ्याप्रती असलेली ओढ दाखवून दिली. प्रकृती ठीक नसतानाही पवार साहेब विशेष विमानाने नागपूरला आले आणि मेघे कुटुंबाचे सांत्वन केले.
नागपूर, रामटेक आणि वर्धा अशा तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांतून निवडून येणारे एकमेव खासदार म्हणून दत्ताभाऊंनी इतिहास घडवला होता. मात्र, आजच्या शोकसभेतील आठवणींनी ते केवळ एक यशस्वी राजकारणी नसून निष्ठेचे प्रतीक असलेले माणूस होते, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले.








