Palghar Land Scam : सात कोटींच्या बाजारमूल्याच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री

Assistant Registrar’s letter to police, MNS warns of agitation : सहाय्यक निबंधकांचे पत्र पोलिसांकडे, मनसेचा आंदोलनाचा इशारा

Palghar : पालघर जिल्ह्याच्या तलासरीमध्ये तब्बल शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तलासरीतील काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित या संस्थेच्या नावावर असलेली 55 एकर शेती जमीन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतची जमीन 2022 साली बाजारमूल्यानुसार साधारण सात कोटी रुपयांच्या किमतीची असताना केवळ 70 लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या व्यवहारामध्ये संस्थेचे अधिकारी आणि तत्कालीन सहाय्यक निबंधक यांच्याच मिलीभगत करून हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप लेखापरीक्षणातून स्पष्ट झाला आहे. विशेष लक्षवेधी बाब म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये संस्थाचालकांमधील काही जणच सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.

या गैरव्यवहारानंतर संस्थेचे ऑडिट करण्यात आले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर सध्याचे सहाय्यक निबंधक आणि लेखापरीक्षक यांनी तत्कालीन संस्थाचालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पालघर पोलिसांना लेखी मागणी केली आहे.

Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

जमीन विक्रीची वास्तविक किंमत आता शेकडो कोटीपर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज वर्तवत हा व्यवहार आर्थिक गैरव्यवहार आणि पदाचा दुरुपयोग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सहकारी संस्थेची जमीन शेतकऱ्यांच्या नावाने देण्यात आली असताना तीच जमीन संस्थेतील मंडळींनीच कवडीमोल दराने विकली गेल्याचे तपासात समोर येत आहे.

दरम्यान, या घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यास विलंब झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका स्तरावर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे तालुका प्रमुख विजय वाडिया यांनी दिला आहे. आर्थिक अनियमितता आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Rohit Pawar : विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून?

याचदरम्यान पालघर जिल्ह्यात आणखी एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील कामांच्या सुरक्षा अनामत रकमेतील तब्बल 111 कोटी 63 लाख रुपये बँकेतून ठेकेदाराच्या नावाने काढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. मात्र या व्यवहाराची दखल बँकेतील कर्मचाऱ्याने घेतल्यामुळे हा संशयास्पद व्यवहार अयशस्वी ठरला. या प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू झाला असून अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांच्या संलग्नतेचा तपास सुरू असल्याचे समजते.

Local body election : 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, पण निकाल न्यायप्रविष्ट !

या संपूर्ण घटनाक्रमावर भाजपचे विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. या घोटाळ्यांबाबत मुख्यमंत्री यांना माहिती देऊन एसआयटी चौकशी लावण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरणार असून आधीही अशा प्रकारचे व्यवहार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पूर्वीच्या कारकिर्दीतील सर्व व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी या संपूर्ण विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने शंका अधिक गडद होऊ लागली आहे.

पालघरमध्ये उघड झालेल्या या सलग दोन आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. शेतकरी आणि नागरिकांचा आक्रोश वाढत असून कारवाई लांबणीवर टाकली गेल्यास मोठे आंदोलन छेडले जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

___