Person commits suicide due to harassment of candidate, causing stir in ward : उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या, प्रभागात खळबळ
Pune : महानगरपालिका निवडणूक प्रचार ऐन भरात असताना एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या आत्महत्येमागे स्थानिक उमेदवाराचा कथित त्रास असल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत आहे.
हडपसर येथील सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासाला आणि टॉर्चरला कंटाळून सादिक यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.
Municipal Council Election : भाजपात ‘निष्ठावान’ विरुद्ध ‘उपरे’ संघर्ष टोकाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हाताच्या पंजावर मजकूर लिहिल्याचे तसेच तब्बल 30 पानांची सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण सविस्तर नमूद करण्यात आले असून, त्यात काही व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहिण्यात आली आहेत. या नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सय्यद नगर भागातील सुमारे पाच गुंठे जमिनीवरून सादिक उर्फ बाबू कपूर आणि फारुख शेख यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. याच वादातून सादिक यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सुसाईड नोटमध्ये अनेक नावे असल्याने तपासाची दिशा अधिक व्यापक झाली आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या सादिक उर्फ बाबू कपूर यांची पार्श्वभूमीही वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विरोधात यापूर्वी मकोका कायद्यांतर्गत कारवाई झाल्याची नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणामागील नेमकी कारणे काय, वैयक्तिक वाद आणि राजकीय दबावाचा कितपत संबंध आहे, तसेच सुसाईड नोटमधील आरोप किती गंभीर आहेत, याचा सखोल तपास पुणे पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचार सुरू असताना घडलेल्या या आत्महत्येमुळे प्रभाग क्रमांक 41 सह संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाचा निवडणूक प्रक्रियेवर आणि राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








