Number of people with criminal background increased in the municipal elections: महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या वाढली
Pune : महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर आली असून निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची मोठी गर्दी असल्याचे उघड झाले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळवण्यासाठी विशेष शाखेकडे तब्बल २ हजार ६५० जणांनी अर्ज केले होते. यापैकी सुमारे १ हजार ५०० अर्जदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे यातील सुमारे ६० उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत असोत किंवा नामांकन मागे घेतलेले असोत, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शहरातील काही कुख्यात गुंड किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक रिंगणात उडी घेतल्याचेही समोर आले आहे. अशा उमेदवारांच्या प्रचार पद्धती, हालचाली, संपर्क जाळे तसेच जमाव जमवण्याच्या प्रयत्नांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर अकोटमधील भाजप-एमआयएम आघाडी तुटली
निवडणूक काळात सामाजिक शांतता अबाधित राहावी आणि दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. संवेदनशील भागांत पोलिस गस्त वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जात आहे.
दरम्यान, कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या विजयासाठी गजा मारणे सक्रिय झाल्याचे समोर आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक काळात त्याला पुणे शहरात प्रवेशास मनाई आहे. मात्र तो शहरालगतच्या गावांमधून कोथरूड मतदारसंघातील मतदारांशी फोनद्वारे संपर्क साधून प्रचार करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गजा मारणे सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.
याशिवाय कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बापू नायर तसेच गजानन मारणे यांच्या नातेवाइकांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संवेदनशील प्रभागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक काळात दहशत, दबाव, बळाचा वापर किंवा आर्थिक प्रलोभनाच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
___








