Tree plantation to keep the memory of Dr. Bhusari alive : १६ लाख ३५ हजारांची मदत जमा, स्मृती जीवंत ठेवण्यासाठी वृक्षारोपण
Chikhli वैचारिक चळवळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भक्कम ओळख निर्माण केलेले डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या रेल्वे अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. एका निमित्ताने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून ‘माणुसकीची भिंत’ उभारणाऱ्या या कार्यकर्त्याला अखेरचा मानवंदन दिला. याच ठिकाणी समाजातील दानशूर व्यक्तींनी एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांची मदत भुसारी परिवारासाठी जाहीर केली.
काही वर्षांपूर्वी चिखली बसस्थानक परिसरात गरजू लोकांना मोफत कपडे उपलब्ध व्हावेत या उद्देशाने डॉ. भुसारी यांनी ‘माणुसकीची भिंत’ उभारली होती. त्याच भिंतीचे प्रतिबिंब रविवारी भोरसा-भोरशी येथे दिसले. हजारोंचा जमलेला जनसमुदाय म्हणजेच डॉ. भुसारींसाठी उभारलेली ‘माणुसकीची चालती-फिरती भिंत’ असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य उपस्थिताना पाहायला मिळाले.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
सावडण्याच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार श्वेता महाले-पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार धुरपतराव सावळे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार मनोज कायंदे, आमदार धीरज लिंगाडे, शिवसेना, भाजप, वंचित, शेतकरी संघटना यांसह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वाधिक मदत मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी १० लाख रुपये जाहीर करत दिली.
तर पुढीलप्रमाणे मदत जमा झाली:
चिखली गुड मॉर्निंग ग्रुप – ५ लाख रुपये
जिल्हा काँग्रेस कमिटी – १ लाख रुपये
वर्तक कुटुंब (वसई-मुंबई) – २५,००० रुपये
इतर देणगीदार – १०,००० रुपये
एकूण जमा : १६ लाख ३५ हजार रुपये
Fake PMO Officer : फडणवीसांच्या कार्यक्रमात PMO सचिव असल्याचा खोटा आव!
कार्यक्रमात उपस्थित अनेकांनी अतिरिक्त मदत देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना, “डॉ. भुसारी यांचा मृत्यू हा पक्षासाठी बलिदान आहे. त्यांच्या मुलांसाठी आणि परिवारासाठी जे काही सर्वोत्तम करता येईल, त्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेईल,” अशी ग्वाही दिली. डॉ. भुसारी यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कार्यक्रमात एक वृक्ष लावण्यात आला.








