व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Raju Jain : खासदार झाल्यानंतर राजू जैन आक्रमक; खासगी क्लासेसच्या विरोधात थोपटले...

Raju Jain : खासदार झाल्यानंतर राजू जैन आक्रमक; खासगी क्लासेसच्या विरोधात थोपटले दंड !

raju-jain-ncp-private-classes-oc-nmc-ultimatum-nagpur : ८० टक्के ट्यूशन क्लासेसच्या इमारतींकडे ‘ओसी’नाही, महापालिकेला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur : सामान्य फ्लॅटधारकांसाठी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (OC) बंधनकारक करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचा कथित दुटप्पी कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. एका बाजूला सामान्य नागरिकांना ‘ओसी’साठी महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागत असताना, दुसरीकडे शहरातील तब्बल ८० टक्के खासगी ट्यूशन क्लासेसच्या इमारतींकडे अधिकृत ‘ओसी’ नसतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

या इमारतींमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या सुरक्षेशी प्रशासन खेळत असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयावर धडक दिली. शहरातील विनाओसी सुरू असलेल्या खासगी क्लासेसच्या इमारतींची येत्या १५ दिवसांत सुरक्षा आणि अग्निरोधक व्यवस्थेची कठोर तपासणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीत योग्य कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात खासदार राजू जैन प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते प्रशांत पवार, महापालिकेतील गटनेत्या आभा पांडे, प्रदेश सचिव बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, शहराध्यक्ष अनिल अहीरकर, विश्वजित तिवारी आणि माजी नगरसेवक राजेश माटे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर संकट, मंत्रिमंडळात बसलेल्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढावे

सुरतसह इतर शहरांमध्ये घडलेल्या कोचिंग क्लासेसमधील अग्निकांडाच्या भीषण दुर्घटनांनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा पार्श्वभूमीवर नागपुरातील विनाओसी इमारतींमध्ये सुरू असलेल्या क्लासेसवर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महापालिकेच्या नियमांचा सामान्य नागरिकांवर कठोरपणे बडगा उगारला जात असताना, खासगी क्लासेसच्या इमारतींबाबत प्रशासन नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या १५ दिवसांच्या अल्टिमेटमनंतर महापालिका प्रशासन विनाओसी सुरू असलेल्या खासगी क्लासेसवर नेमकी काय कारवाई करते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!