व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर संकट, मंत्रिमंडळात बसलेल्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढावे

Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर संकट, मंत्रिमंडळात बसलेल्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढावे

obc-fund-chhagan-bhujbal-cabinet-exit-vijay-wadettiwar-nagpur : ओबीसींचा निधी अन् मंत्रिमंडळाच्या बैठकीतून भुजबळांच्या एक्झिटवर वडेट्टीवार काय म्हणाले?

Nagpur : राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महायुती सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर मोठे नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले असताना, मंत्रिमंडळात बसलेल्या छगन भुजबळ यांनी केवळ वक्तव्ये न करता थेट रस्त्यावर उतरून समाजाच्या हक्कांसाठी लढावे, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला. ओबीसी समाजाला पुरेसा निधी दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले होते. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी भुजबळांच्या भूमिकेवरही भाष्य केले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात ओबीसी समाजाचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. महायुती सरकारच्या धोरणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या आरक्षित जागांवर संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे, ओबीसी विद्यार्थ्यांना वेळेवर वसतिगृह मिळत नाहीत. शिष्यवृत्तीची रक्कम तुटपुंजी असून, तीही वेळेवर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही. ‘स्वाधार’ योजनेचा लाभ रखडला आहे. तसेच ओबीसी महामंडळाच्या विविध योजनांचा अपेक्षित लाभही गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या परिस्थितीमुळे ओबीसी समाजातील गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Powers reduce : शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याच्या अधिकारांना कात्री?

छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, “भुजबळ स्वतःला ओबीसी समाजाचे नेते मानतात. ते मंत्रिमंडळात बसलेले असताना त्यांच्याच डोळ्यादेखत ओबीसींचे आरक्षण आणि सवलती डावलल्या जात असतील, तर त्यांनी सत्तेत राहून लाचारी पत्करण्यापेक्षा रस्त्यावर उतरले पाहिजे.” भुजबळ यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी सरकारला थेट जाब विचारावा. अन्यथा मंत्रिमंडळात राहून ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाचे तेही समान वाटेकरी ठरतील, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. सत्ताधारी ओबीसी नेत्यांनी समाजाच्या प्रश्नांवर ठोस आणि आक्रमक भूमिका घेतली नाही, तर समाज त्यांना माफ करणार नाही. केवळ खुर्ची उबवून प्रश्न सुटणार नसून, त्यासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही ते म्हणाले.

राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरही वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. राज्यात सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो गरीब, कष्टकरी आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पैशाच्या जोरावर गैरप्रकार करणाऱ्यांचे भले होत असून, मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट व्यक्तींच्या सहभागाशिवाय पेपरफुटी शक्य नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

Pravin Datke : नागपूर भाजपचे पोलीस आयुक्तांनाच थेट आव्हान!

सरकारने केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर वरवरची कारवाई न करता पेपरफुटीच्या प्रकरणातील मूळ सूत्रधारांचा शोध घ्यावा. मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते लोकसेवा आयोगातील संशयितांपर्यंतच्या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

error: Content is protected !!