“Hold Drought Meetings at Stadiums and Let People Know”: Sanjay Raut Challenges the Government : उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ कारभाराची भाजपने करून दिली आठवण
Mumbai राज्यात पावसाने मारलेल्या ओढ्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उभी पिके करपून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विरोधकांकडून राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच, आज (मंगळवार) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान काजू-बदामाच्या पाहुणचारावरून झालेल्या वादाचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “मंत्रिमंडळाची बैठक घ्यायचीच असेल तर ती खुल्या स्टेडियमवर घ्या. पत्रकारांसह सर्वांनाच तिथे प्रवेश द्या. बैठकीत कोण काय खातोय आणि शेतकर्यांसाठी नक्की काय खरे निर्णय घेतले जातात, हे जनतेला थेट कळू द्या. आत एक निर्णय घ्यायचा आणि बाहेर येऊन भलतेच सांगायचे, हे थांबले पाहिजे.”
संजय राऊत यांच्या या आव्हानाचा भाजपच्या प्रवक्त्यांनी तात्काळ आणि घणाघाती समाचार घेतला. राऊत यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाची आठवण करून देत भाजपने पलटवार केला. “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे दोन वर्षांच्या कार्यकाळात किती वेळा मंत्रालयात गेले होते? ते स्वतः ‘मातोश्री’वरूनच सरकार चालवत होते,” असा थेट सवाल उपस्थित करत भाजपने राऊतांचा टोला त्यांच्यावरच उलटवला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीचा पंचनामा व सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांना योग्य मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र, एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मदतीचे दावे करत असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे दुष्काळाचा मुद्दा आता पूर्णपणे पेटला आहे.








