Death while returning to Chikhli, mourning in political circles : चिखलीकडे परतताना काळाचा घाला, राजकीय वर्तुळात शोककळा
Buldhana : चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा धावत्या रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. डॉ. भुसारी हे मुंबईहून चिखलीकडे परतत असताना कसारा घाटात रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
डॉ. भुसारी यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजसेवेची सुरुवात केली होती. सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. नुकतीच काँग्रेस पक्षाने त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मुंबई येथे पक्षाच्या बैठकीसाठी ते गेले होते आणि परतताना हा अपघात घडला.
Local Body Elections : नगराध्यक्षपदांचा तिढा कायम; सत्तासमीकरणाचा वाद राज्यस्तरावर!
घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रेल्वेतून डॉ. भुसारी प्रवास करत होते ती गाडी कसारा स्टेशनवर थांबत नव्हती. अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Local Body Elections : भाजपात उमेदवारीसाठी चढाओढ, एकमेकांच्याच विरोधात उभे ठाकले!
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राहुल बोंद्रे, उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर तसेच आमदार श्वेता महाले-पाटील यांचे पती विद्याधर महाले यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.








