Interviews Held for 4 Mayoral and as Many as 119 Corporator Candidates : नगराध्यक्षपदासाठी ४, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ११९ जणांची मुलाखत
Chikhli आगामी चिखली नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ४ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ११९ इच्छुकांनी आपली उमेदवारी सादर करत ९ नोव्हेंबर रोजी बालाजी अर्बन सभागृहात झालेल्या मुलाखतींमध्ये सहभाग घेतला.
या मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुकाने आपले शहरासाठीचे कार्य, विकासाची दृष्टी आणि सामाजिक सहभाग पक्षनेतृत्वासमोर मांडला. पक्षाच्या उच्च नेत्यांनी उमेदवारांचे कामकाज ऐकून योग्य आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व पुढे आणण्याचा संकल्प व्यक्त केला.
Local Body Elections : २५ वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्यांनी रात्रीतून बदलला पक्ष!
मुलाखतीनंतर झालेल्या बैठकीत जिल्हा निवडणूक प्रभारी तथा राज्याचे कामगार मंत्री मा. अॅड. आकाश फुंडकर, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या विकास आराखड्यावर, नागरिकांच्या समस्या आणि संघटनशक्तीच्या मजबुतीवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत चिखली शहरात झालेला विकास हा भाजपच्या स्थिर व प्रामाणिक नेतृत्वामुळे शक्य झाला. रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, सामाजिक भवनं, गार्डन, सांस्कृतिक भवनं, प्रशासकीय इमारत अशा अनेक पायाभूत सुविधा उभारून शहराचा कायापालट करण्यात आला आहे. हा विकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा नगरपरिषद भवनावर फडकवणे हेच आपले ध्येय आहे.”
बैठकीत नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्साह, संघटनशक्ती आणि विकासाची वचनबद्धता यांमुळे चिखली नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास या बैठकीतून झळकला.








