व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Student Protest : नीट परीक्षेच्या धर्तीवर एमपीएससीविरोधात विरोधक आक्रमक

Student Protest : नीट परीक्षेच्या धर्तीवर एमपीएससीविरोधात विरोधक आक्रमक

mpsc-exam-paper-leak-student-protest-rohit-pawar-supriya-sule-pune : पुण्यात धडक मोर्चा काढत राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनागोंदी आणि वारंवार होणाऱ्या परीक्षा विलंबाविरोधात राज्यातील विद्यार्थी आणि तरुण आक्रमक झाले आहेत. पेपरफुटी, परीक्षा ऐनवेळी रद्द होणे आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत एमपीएससीविरोधात पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले.

‘क्रॉक्रोच जनता पार्टी’च्या धर्तीवर झालेल्या नीट परीक्षा विरोधी आंदोलनानंतर आता एमपीएससीच्या कारभाराविरोधातही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी पुण्यात एकवटले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे.

एमपीएससीचा कारभार भोंगळ असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राहिलेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला. वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून, परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत वाया जात आहे. त्यामुळे एमपीएससीच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Mahayuti Controversy : संजय दत्तच्या मराठीवरून शिवसेना-भाजप आमदार आमनेसामने

परीक्षा प्रक्रियेतील या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. केवळ परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करणे एवढ्यापुरते आयोगाचे काम मर्यादित नसून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सर्व परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने सरकारने केवळ आश्वासने न देता चर्चेसाठी पुढे यावे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Anand Niketan : बाबा आमटेंच्या ‘आनंद निकेतन’ची धुरा दुसऱ्या संस्थेकडे जाणार?

जंतरमंतरवरील आंदोलनानंतर ज्या पद्धतीने तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर दबाव निर्माण झाला होता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांचा रोष वाढताना दिसत आहे. एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि विलंबाचा मुद्दा आता राजकीयदृष्ट्याही तापण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विरोधक आणि विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!