No Pawar versus pawar fight in future, sunetra pawar cleared: फुटलेले पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात पुन्हा एकत्र येण्याचे संकेत
Nagpur महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या ‘पवार विरुद्ध पवार’ या संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी आज नागपूर दौऱ्यावर असताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले. भविष्यात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार नाही, अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या विधानामुळे फुटलेले पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर सुनेत्रा पवार आज प्रथमच नागपूरमध्ये आल्या होत्या. निमित्त होते, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाचे. या स्पर्धेला त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्री म्हणून हजेरी लावली. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कौटुंबिक एकोप्यावर भाष्य केले. विशेष म्हणजे, आजच खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील पुण्यात बोलताना यापुढे पवार कुटुंबीयांच्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात मी लढणार नाही, असे जाहीर केले. या भूमिकेबद्दल विचारले असता सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे मनापासून स्वागत केले.
Bacchu kadu : बच्चू कडूंचा अखेर ‘यू-टर्न’; ‘प्रहार’चा बाणा बाजूला सारत बांधले शिवबंधन
मी राजकारणात आल्यापासून हीच भूमिका मांडत आहे की, कुटुंब आणि राजकारण नेहमी वेगळे ठेवले पाहिजे. आम्हा सर्व कुटुंबीयांची सुद्धा हीच इच्छा आहे की भविष्यात आपसात असा सामना होऊ नये, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद-भावजय आणि काका-पुतण्या असा थेट संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, बदललेल्या परिस्थितीत आता दोन्ही बाजूंनी मवाळ भूमिका घेतली जात आहे. कौटुंबिक कटुता बाजूला सारून पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येण्याचे संकेत या निमित्ताने मिळत असून, या नव्या राजकीय वळणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








