Supriya Sule attacks government in Nagpur: देशात महागाई आणि बेरोजगारी गगनाला भिडल्याची टीका
Nagpur सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नसून देश वाचवण्याची आहे. आपापसात तू-तू, मै-मै करून घरं आणि पक्ष फोडण्याचे उद्योग आम्ही कधी केले नाहीत आणि भविष्यातही करणार नाही, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी फुटीच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
शनिवारी नागपूर दौऱ्यावर आल्या असता, विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात रंगलेल्या आमदार आणि नेत्यांच्या अंतर्गत भेटीगाठींच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. लोकप्रतिनिधींनी कामासाठी एकमेकांना भेटणे स्वाभाविक असल्याचे सांगत, मी स्वतः काही कामाच्या निमित्ताने कालच भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अशा भेटींचा राजकीय अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, आपल्या पक्षातील कोणत्याही आमदार किंवा खासदाराशी भाजपने संपर्क साधलेला नाही, असे सांगत त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
पुढे बोलताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत विद्यमान राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. देशात महागाई आणि बेरोजगारी गगनाला भिडली असून, ‘नीट’ परीक्षेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आणि सर्वसामान्यांचे हे अत्यंत गंभीर विषय प्रलंबित असताना, विरोधक केवळ फुटीच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात वेळ घालवत आहेत, हे राज्याचे दुर्दैव्य असल्याची घणाघाती टीकाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.








