व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : नगरसेवकांना आचार संहितेची सुटी, म्हणून ते गोवा पर्यटनाला, राजू...

Legislative election : नगरसेवकांना आचार संहितेची सुटी, म्हणून ते गोवा पर्यटनाला, राजू पोतदार यांचा अजब दावा

Corporators are on holiday tour of goa, Rajiv potdar claims : विधान परिषदेच्या निवडणुकीशी नगरसेवकांच्या सहलीचा संबंध नाही

Nagpur नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा नेते करत असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या नगरसेवकांना थेट गोव्याला रवाना करण्यात आले आहे. या ‘गोवा टूर’मुळे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असतानाच, भाजपचे उमेदवार डॉ. राजू पोतदार यांनी यावर एक अत्यंत अजबगजब दावा केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सध्या नगरसेवकांना कोणतीही विकासकामे करता येत नाहीत, त्यामुळे त्यांना एकप्रकारे सुट्टीच आहे आणि याच काळात ते पर्यटनासाठी गेले आहेत, असा युक्तिवाद पोतदार यांनी केला. त्यांच्या या पर्यटनाचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नसून, सर्व नगरसेवक स्वतःच्या खर्चाने गेले असल्याने येथे आचारसंहिता भंगाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी या दौऱ्याला ‘अभ्यासवर्गा’चा रंग देण्याचाही प्रयत्न केला. हा दौरा अचानक ठरलेला नसून, नगरसेवकांचा अभ्यासवर्ग तीन महिन्यांपूर्वीच ठरला होता, १५, १६ आणि १७ जून या तारखेला हा अभ्यासवर्ग असून त्यानंतर निवडणूक जाहीर झाली, असा दावाही त्यांनी केला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच नगरसेवकांना ‘अभ्यास’ सुचल्याने आणि तोही थेट गोव्यात असल्याने राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक भाजप आणि महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. नोव्हेंबर २०२४ पासून चंद्रशेखर बावनकुळे यांची ही जागा रिक्त असल्याने भाजपने येथे विजयासाठी जबरदस्त प्लॅनिंग केले आहे. २९ नगरपालिका आणि महानगरपालिका मिळून येथे एकूण ८३६ मतदार आहेत. यातील २७ नगरपालिकांपैकी २५ ठिकाणी भाजपचे नगरसेवक असून २ पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. एकूण ५०४ मतदार महायुतीचे असून, आमच्याकडे सध्या ५८२ मते असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजप उमेदवाराच्या मते, आम्ही ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढत आहोत. पक्षाने बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापासून ते जिल्हाध्यक्षपदापर्यंत मला अनेक संधी दिल्या. सावनेर विधानसभा निवडणुकीचे तिकीटही मला देण्या आले होते.

 

Sudhir mungantiwar: कॉकरोच जनता पार्टी’चा अजेंडा युवकांचे कल्याण नव्हे, फक्त भाजपविरोध; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघाती प्रहार

या मतदारसंघात निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना आम्ही केदारांचे साम्राज्य संपवले. आताही सर्व कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले असून, टीमवर्कच्या जोरावर आम्ही एकतर्फी विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकीकडे भाजप बहुमताचा दावा करत नगरसेवकांना गोव्याची वारी घडवून आणत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही या जागेसाठी पूर्ण ताकद लावली आहे. डॉ. राजू पोतदार यांच्या विरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे निवडणूक लढवत असल्याने ही लढत अधिक प्रतिष्ठेची झाली आहे. या पत्रकार परिषदेला आनंद राऊत, मनोहर कुंभारे, अरविंद गजभिये, आकाश पटले, आशिष फुटाणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!