Tanushree Duttas serious allegations, Nana Patekars hand in it : तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप, यात नाना पाटेकरांचा हात
Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा खळबळजनक आरोप करत संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात गेल्या काही वर्षांपासून ती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. व्हिडिओमध्ये तिच्या डोळ्यांत अश्रू होते आणि ती मदतीची याचना करत आहे. या व्हिडिओत तिने कोणाचेही नाव घेतले नव्हते, मात्र त्यानंतर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत तिने थेट नाना पाटेकरांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्री म्हणते, गेल्या चार-पाच वर्षांपासून माझ्या आयुष्यात अनेक विचित्र घटना घडत आहेत. माझ्यावर मानसिक आणि शारीरिक पातळीवर अत्याचार होत आहेत. माझं आरोग्य बिघडलं आहे, काम करावं तर ती संधीही हिरावली जाते आहे. तिच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये तिने अनेक प्रोजेक्ट साईन केले होते, मात्र एका मागोमाग एक सर्व प्रोजेक्ट तिच्याकडून काढून घेण्यात आले.
Maharashtra politics : नगरविकासच्या निधी वाटपावर आता मुख्यमंत्र्यांची ‘अंतिम मोहर’
तनुश्रीने सांगितलं की, उज्जैनमध्ये एकदा तिच्या गाडीचा ब्रेक काढून टाकण्यात आला होता. माझ्या मागे सतत काही लोक असायचे, पाठलाग होत असल्याचं जाणवायचं. माझा फोन हॅक करण्यात आला होता. या सर्व प्रकारामागे कोण आहे हे शोधणं पोलिसांचं काम आहे, पण मला नाना पाटेकरांवर संशय आहे.
सर्वात गंभीर आरोप करताना तनुश्री म्हणाली, जे काही सुशांतसिंग राजपूतसोबत घडलं, तेच माझ्यासोबत घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक वेळा माझ्या अन्नात ड्रग्स किंवा विष मिसळलं गेलं. मला कमकुवत बनवण्याचा, वेडं ठरवण्याचा आणि अखेर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Mahajan vs Khadse : मानसिक संतुलन बिघडले, मला त्यांची कीव येते
तनुश्रीने पुढे स्पष्ट केलं की, या सर्व कारवायांमागे नाना पाटेकरांचा हात आहे. मी त्यांच्यावर केस केल्यापासूनच या गोष्टी सुरू झाल्या आहेत. ते फक्त अभिनेते नाहीत, स्वतःचं कबूल केलंय की ते अंडरवर्ल्ड डॉन झाले असते. त्यांच्या सोबत बॉलिवूडमधील त्यांचे सहकारी आणि तथाकथित माफियांचा हात आहे. तिने संशय व्यक्त केला की तिच्या घरात काम करणारी मेड देखील त्यांच्या टोळीचा भाग होती. ती माझ्या अन्नात काहीतरी मिसळायची, त्यामुळे मी 16 ते 17 तास बेशुद्ध असायचे. सुरुवातीला मी शांत होते, पण जेव्हा सहनशक्ती संपली, तेव्हा मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, असं ती म्हणाली.
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना यावर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’
याआधीही 2018 मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा संदर्भ देत तिने त्या काळातही मोठा आवाज उठवला होता. आता पुन्हा एकदा या प्रकरणात गंभीर वळण आलं आहे. या गंभीर आरोपांवर नाना पाटेकर किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. पण या आरोपांनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
_____








