tukaram-mundhe-warning-against-misleading-advertisements-action-on-celebrities : धडक कारवाईची मालिका सुरू, आता दिशाभूल करणाऱ्या सेलिब्रिटी, जाहिरातदार, कंपन्यांवर कारवाई
Mumbai : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडक कारवाईची मालिका सुरू केली आहे. अवैध गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवल्यानंतर आता त्यांनी ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. चुकीची माहिती देणाऱ्या आणि अवास्तव दावे करणाऱ्या जाहिरातींना यापुढे मोकळीक दिली जाणार नाही. विशेष म्हणजे अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटी, ब्रँड ॲम्बेसेडर, जाहिरातदार आणि उत्पादकांवरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांबाबत अतिशयोक्तीपूर्ण दावे करतात. आरोग्य, सौंदर्य, वजन कमी करणे, रोगांवरील उपचार किंवा इतर फायद्यांचे आश्वासन देत ग्राहकांची दिशाभूल केली जाते. अशा जाहिरातींमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक आणि आरोग्यविषयक फसवणूक होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे ग्राहक संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासन आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
मुंढे यांनी स्पष्ट केले की, केवळ उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांनाच नव्हे तर त्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकांची जबाबदारी निश्चित केली जाईल. ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविण्याच्या प्रक्रियेत जाहिरात एजन्सी, उत्पादक, वितरक तसेच ब्रँड ॲम्बेसेडर यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात संबंधित सर्वांवर कायदेशीर जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थीं वगळले नसल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामकाजात मोठी गती आल्याचे दिसून येत आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाचवेळी विशेष धाडसत्र राबविण्यात आले.
गेल्या काही दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी मोहीम राबविली आहे. ३० आणि ३१ मे रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ४० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत ३२ आरोपींना अटक करण्यात आली असून २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २६ आस्थापनांना सील करण्यात आले असून सुमारे १२.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोकण विभागात सर्वाधिक १६ आरोपींना अटक करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर विभागात ११ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
पुणे आणि नाशिक विभागातही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन वाहनांसह मोठा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर भारतीय दंडसंहितेतील विविध कलमांखाली तसेच अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने पाच ठिकाणी धाड टाकून तब्बल १९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. काही ठिकाणी विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच विशेष मोबाईल ॲप आणि टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. नागरिकांना थेट तक्रारी नोंदविता याव्यात आणि त्यावर तातडीने कारवाई करता यावी, हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
Ramdas athawale : “दगा करणार नाही, पण आरपीआयला गृहीत धरू नका”
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने अवघ्या काही दिवसांत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भेसळखोर, अवैध गुटखा विक्रेते आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि विश्वासाशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








