ramdas-athawale-warning-to-mahayuti-rpi-demanded-respect : महायुतीला रामदास आठवलेंचा स्पष्ट इशारा; विधान परिषद, महामंडळांमध्ये सन्मानाची मागणी
Mumbai : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील आपल्या पक्षाच्या स्थानाबाबत स्पष्ट भूमिका मांडत मित्रपक्षांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) हा महायुतीचा विश्वासू घटक पक्ष असून, त्याला गृहीत धरले जाऊ नये, असे सांगत त्यांनी विधान परिषदेत हक्काची जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आगामी महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व आणि सन्मान मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
रामदास आठवले यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, ज्या काळात भाजप आणि शिवसेनेसोबत इतर राजकीय पक्ष किंवा नेते उभे राहत नव्हते, त्या काळात आरपीआयने या युतीसोबत ठामपणे साथ दिली. आरपीआयच्या सहभागामुळेच या युतीचे रूपांतर व्यापक महायुतीमध्ये झाले आणि समाजातील वंचित, गरीब तसेच शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अधिक प्रभावीपणे झाले.
आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये आरपीआयच्या वाढत्या संघटनात्मक ताकदीचाही उल्लेख केला. पक्षाचा विस्तार देशभरात होत असून, आगामी काळात पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी सत्तेत आरपीआयचा हक्क आणि सन्मान कायम राखला जावा, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महायुतीबाबतची आपली निष्ठा अधोरेखित करताना रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दिलेला शब्द पाळणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे ते महायुतीशी कधीही दगाफटका करणार नाहीत. “आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत,” असे त्यांनी नमूद केले. मात्र, या भूमिकेचा अर्थ आरपीआयला कमी लेखणे किंवा गृहीत धरणे असा होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विधान परिषदेत पक्षाला हक्काची जागा मिळायला हवी होती, असे सांगत त्यांनी आगामी महामंडळ आणि शासकीय संस्थांच्या नियुक्त्यांमध्ये तरी पक्षाच्या निष्ठेचा आणि मैत्रीचा योग्य सन्मान राखला जावा, अशी मागणी केली.
Mlc election : तब्बल ८ मतदारसंघांत बंडखोरी, उमेदवारी अर्जांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेबाबतही रामदास आठवले यांनी वेगळे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता त्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या सन्मान आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानांची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील जागावाटप, प्रतिनिधित्व आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवर आगामी काळात अधिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








