Vidarbha bhawan to be built in new mumbai: खारघरमध्ये २ एकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश
Nagpur नवी मुंबईतील खारघर-पनवेल परिसरात विदर्भातील नागरिकांसाठी हक्काचे “विदर्भ भवन” उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांनी हिवाळी अधिवेशन २०२६ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज पार पडलेल्या बैठकीत महसूल मंत्र्यांनी खारघर येथे दोन एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.
नवी मुंबई, खारघर व पनवेल परिसरात विदर्भातील मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास आहेत. या नागरिकांच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी तसेच विदर्भातून मुंबई-नवी मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना तात्पुरती आणि हक्काची सोय उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ भवन उभारणे अत्यंत गरजेचे होते. विदर्भ सेवा सहयोग फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत या भागात सातत्याने उपक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दटके यांनी या प्रकल्पासाठी शासनातर्फे दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी आणि आवश्यकता भासल्यास सीएसआर (CSR) फंड उपलब्ध करावा, अशी ठाम मागणी केली होती.
Nagpur Politics : तिवारी-गुडधे वादात खोपडेंची एंट्री; ‘१८ वर्षे तोंड कोणी बंद केले होते?’
आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आमदार प्रवीण दटके, तर प्रत्यक्ष बैठकीत आमदार विक्रांत पाटील आणि विदर्भ सेवा फाउंडेशनचे चित्तरंजन टेंभेकर उपस्थित होते. विदर्भ परिवारांना एकत्र आणण्यासाठी आणि हक्काचे केंद्र सुरू करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने पावले उचलत प्रशासनाला जागेचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. या विदर्भ भवनच्या माध्यमातून नवी मुंबईत स्थायिक झालेल्या विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असून, हा एक प्रकारे ‘अडव्हांटेज फडणवीस’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.








