142 farmer suicides in eight months : शेतमालाला भाव नाही, शेतकरीविरोधी धोरण असल्याचा आरोप
Amravati लहरी निसर्गाचा सततचा मार, अतिवृष्टी, शासनाची उदासीनता, दुबार पेरणी, उत्पादन खर्चातील झपाट्याने वाढ आणि शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे—या कारणांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केवळ ऑगस्ट महिन्यातच २६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
शासनाच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२४ या चार वर्षांत १,२४९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. यंदा जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १४२ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यापैकी २८ प्रकरणे पात्र ठरली असून कुटुंबांना मदत दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. १९ प्रकरणे अपात्र ठरली, ९५ प्रकरणांची चौकशी सुरू असून दोन प्रकरणांची फेरचौकशी सुरू आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात तूर, सोयाबीनच्या पेंढ्या फेकल्या
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी केंद्र व राज्य शासन ‘मगरीच्या अश्रूंप्रमाणे’ दु:ख व्यक्त करते, अशी टीका शेतकरी संघटनांनी केली आहे. प्रत्यक्षात मात्र, आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. जुलै २०२४ मध्ये महायुती सरकारने “राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू” अशी ग्वाही दिली होती. मात्र, अमरावती जिल्ह्यातील आत्महत्यांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही.
दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी या अस्मानी संकटांसह निवडणूकपूर्व राजकीय निर्णयांनीही शेतकऱ्यांची स्थिती बिकट केली आहे. गहू, तांदूळ, साखर यांच्या निर्यातीवर बंदी, कांद्यावर निर्यातशुल्क आणि खाद्यतेल, कडधान्यांची आयात सुरू ठेवल्याने शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत. “शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे; परंतु सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष प्रवीण मोहड यांनी सांगितले.
जिल्ह्यात सरासरी ८३१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात आतापर्यंत ७१९.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरीपेक्षा ११२ मि.मी. कमी (१४ टक्के घट). काही तालुके व मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी, एकूण पाऊस सरासरीपेक्षा अपुरा आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.








