पुण्यात बंडाच्या चर्चेने रंगत , अमरावतीतही धाकधूक वाढली
Mumbai : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात असतानाच पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महायुतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
महायुतीच्या चर्चेत आलेल्या फॉर्म्युल्यानुसार पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघही भाजप लढवणार असून, अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना आणि संभाजीनगरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने संभाव्य उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असल्याचे समोर आले आहे.
मनपातील ‘पदोन्नती’ प्रकरणात आयुक्तांना २४ तासांचा अल्टिमेटम!
मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. चिवटे सुरुवातीपासूनच महायुतीकडून या मतदारसंघासाठी इच्छुक होते. त्यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, भाजप नेत्यांकडून पुण्याच्या दोन्ही जागांवर दावा करण्यात येत होता. जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर चिवटे यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे.
अमरावतीतही महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. दिलीप कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि आमदार सुधाकर आडबाले त्यांच्या समर्थनार्थ उपस्थित होते. अमरावतीची जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने महायुतीतील समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.
अमरावतीत शिंदेसेनेचा ‘गेम प्लॅन’; बच्चू कडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी?
दरम्यान, महाविकास आघाडीतही जागावाटपाचा तिढा कायम आहे. ठाकरे गटाने अमरावती आणि मराठवाडा मतदारसंघांवर दावा केल्याने काँग्रेसची भूमिका अडचणीत आली आहे. जागावाटपावर एकमत न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या भूमिकेची चर्चाही सुरू आहे.
त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा अधिकृत रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच दोन्ही आघाड्यांतील अंतर्गत राजकारण समोर आले असून, उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या टप्प्यावर कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
____








