काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन; चिखलदऱ्यातील शिबिराचा समारोप
Amravati भारतीय संविधान, लोकशाही आणि बहुजन समाजाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि निर्भीडपणे संघर्ष करावा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. संविधान हे बहुजन समाजाच्या हक्कांचे आणि भविष्याचे सुरक्षा कवच आहे. या कवचाला धक्का लागला, तर सामान्य नागरिकांचे अधिकार धोक्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक विभागांच्या पदाधिकाऱ्यांसाठी चिखलदरा येथे आयोजित दोन दिवसीय ‘लोकशाही मूल्यसंवर्धन अभियान’ शिबिराचा १८ ऑक्टोबर रोजी समारोप झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या शिबिरात संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले.
शेतकऱ्यांना एक लाखांची मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार!
संविधानवादी विचार, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरू झालेली वैचारिक चळवळ देशभर पोहोचली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. या शिबिरातून झालेली विचारांची पेरणी भविष्यातील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. समाजातील विविध घटकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची किमान ५० शिबिरे आयोजित केली पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
सत्ता मिळवणे हेच राजकारणाचे अंतिम उद्दिष्ट नसून वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सत्तेत बदल होत राहतील; मात्र संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्याचा संघर्ष थांबता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याची परंपरा काँग्रेसने जपली आहे, असे सांगत त्यांनी पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा उल्लेख केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा ठामपणे मांडल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही संविधानाची मूलभूत मूल्ये असल्याचे सांगितले. ही मूल्ये केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारात उतरवली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
विविध विषयांवर दोन दिवस विचारमंथन
शिबिरात चंद्रकांत झटाले, निरंजन टकले, अक्षय राऊत, प्रा. निखिल रांजणकर, अॅड. सीमा तेलंगे, प्राजक्ता हनमघर, हनुमंत पवार, श्रद्धा रेखा राजेंद्र आणि प्रा. प्रवीण देशमुख यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
राष्ट्रनिर्मितीतील काँग्रेसचे योगदान, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा, देशाची आर्थिक स्थिती, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न, महिलांचे संवैधानिक अधिकार, राजकीय नेतृत्वातील नैतिकतेचा ऱ्हास आणि धर्मांधतेचे आव्हान अशा विषयांवर चर्चा झाली.








