उद्धवसेनेचा सरकारला अल्टिमेटम; ३० ऑक्टोबरला शेलू बाजार इंटरचेंजवर रास्ता रोको
Akola दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी दिला. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार इंटरचेंज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी होतील, असे त्यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
पाच हजारांच्या मदतीवरून सरकारवर टीका
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत घोषित केली. मात्र, महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असून, या पैशांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करावी, असा सवाल देशमुख यांनी केला.
पावसाअभावी सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना अद्याप पीकविम्याची रक्कमही मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी. अन्यथा उद्धवसेना आणि शेतकरी एकत्र येऊन ३० ऑक्टोबरला समृद्धी महामार्ग रोखतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
पाच जिल्ह्यांतील १० हजार शेतकरी सहभागी होणार?
या आंदोलनात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच, या पाच जिल्ह्यांतील जवळपास १० हजार शेतकरी आंदोलनात सहभागी होतील, असा दावा देशमुख यांनी केला.
पत्रकार परिषदेला बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, वाशिम जिल्हाप्रमुख बालाजी वानखडे, अमरावती जिल्हाप्रमुख पराग गुडधे, प्रफुल्ल भोजने, गजानन वाघ, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, उपजिल्हाप्रमुख संजय शेळके, सुरेंद्र विसपुते, अकोला पश्चिमचे शहरप्रमुख आशिष गावंडे, अकोला पूर्वचे शहरप्रमुख राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभय खुमकर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, संजय भांबेरे आदी उपस्थित होते.
गँगची पाळेमुळे उखडून टाकू, चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांचा थेट फोन
मंत्र्यांच्या हेअर डायवरूनही टोला
शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने त्यांची थट्टा केली आहे, अशी टीका देशमुख यांनी केली. सरकारमधील काही मंत्र्यांच्या डोक्यावरील केस आणि दाढी रंगविण्याचा अर्थात ‘हेअर डाय’चा खर्चच पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असतो, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.








