MLA Vikas Thakre exposes an alleged garbage scam in Nagpur : जिल्हा नियोजन बैठकीत कंत्राटदाराच्या निकृष्ट कामगिरीवर बोट
Nagpur जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड करत एजी एन्व्हॉरो आणि बीव्हीजी इंडिया या दोन्ही कंत्राटदारांचे दोन नवे घोटाळे बाहेर काढले आहेत. नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत निकृष्ट कामगिरी आणि करारभंग करून, तसेच मनपाच्या सर्वसाधारण सभेने करार रद्द करण्याचा ठराव मंजूर करूनही, संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने या कंपन्यांना मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत उघड झालेल्या पहिल्या घोटाळ्यानुसार, करारातील अटी व कामगार कायद्यांनुसार नियमित कामगारांची नियुक्ती करणे बंधनकारक असताना, दोन्ही कंत्राटदार ऑटो-टिपर, जेसीबी, कंटेनर तसेच गारबेज ट्रांसफर स्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर ठिय्या मजुरांकडून काम करून घेत आहेत. यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी कंत्राटदारांना संरक्षण दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
Salil Deshmukh : काम न करणाऱ्यांना डच्चू, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
दुसऱ्या एका धक्कादायक प्रकारात, सायंकाळी भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील वजनकाट्यावर वजन झाल्यानंतर काही कंटेनरमधील कचरा डम्पिंग यार्डमध्ये न टाकता शेजारील पार्किंग यार्डमध्येच ठेवण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हाच कचरा पुन्हा ट्रकमध्ये भरून वजनकाट्यावर नेला जातो आणि त्याचे पुन्हा वजन केले जाते. अशा प्रकारे एकाच कचऱ्याचे दोन वेळा वजन करून नागपूर महानगरपालिकेची मोठी आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे त्यांनी पुराव्यासह निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनातही या दोन्ही कंत्राटदारांविरोधात आवाज उठवला असताना आणि त्यावेळी नगरविकास राज्यमंत्र्यांनी कंत्राट रद्द करण्याचे आश्वासन देऊनही कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याबद्दल आमदार ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या दोन्ही कंपन्यांचे करार तात्काळ रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकणे, डम्पिंग यार्डलगतचे पार्किंग यार्ड तातडीने हटवणे, स्वतंत्र विभागामार्फत कामगारांची नियमित तपासणी करणे, तसेच या घोटाळ्यांप्रकरणी दोषी कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर मोठा आर्थिक दंड आकारून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.








