व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दुष्काळी मदतीच्या नुसत्याच घोषणां पण मदतीचे काय?

दुष्काळी मदतीच्या नुसत्याच घोषणां पण मदतीचे काय?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

Washim : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. दिवाळीपर्यंत मदत देण्याच्या आश्वासनावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्यातून वाचा फोडली.

वाशिम येथील उमाळेमाले लेआऊट परिसरात सोमवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरताना, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाच रुपयेही मिळणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. मदतीबाबत आश्वासने दिली जात असली, तरी त्याची अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी नमूद केले.

५०० कोटींचा ‘ऑडिओ बॉम्ब’! महायुतीत नेमका कोणाचा खेळ सुरू आहे?

छोटी राज्ये निर्माण झाल्यास विकासाला गती मिळू शकते, अशी भूमिका महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडल्याचा संदर्भ देत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वाशिम जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला. अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा होऊन २८ वर्षे उलटली, तरीही त्याची ओळख आकांक्षित जिल्हा म्हणून कायम असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधींना शासनदरबारी प्रभावीपणे मांडता येत नसतील, तर विकासाची अपेक्षा कशी करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची त्यांची जबाबदारी याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांचा घोळ, ‘तुझा-माझा’ करण्यात वेळ घालवला

मतदारांनी जागरूक राहण्याचे आवाहन करताना ॲड. आंबेडकर यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मतदान हा स्वातंत्र्याचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगत, सरकारकडून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला होत असल्याची टीकाही त्यांनी केली. या मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे आणि माजी आमदार नातीकुद्दीन खतीब यांनी मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सिद्धार्थ भगत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शालीग्राम पठाडे यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले, तर हर्षल इंगोले यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

error: Content is protected !!