MLA Siddharth Kharat in action mode on water shortage : मेहकर-लोणारमध्ये पाणीप्रश्नावर आमदारांचा धडक आढावा; ‘एकही गाव तहानलेले राहणार नाही’
Mehkar उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना मेहकर व लोणार तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुढाकार घेत पाणीप्रश्नावर विशेष आढावा बैठक घेतली. मेहकर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जनसंवाद आमदार संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीत मेहकर व लोणार तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, टँकरद्वारे सुरू असलेला पुरवठा, अधिग्रहित विहिरी तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमधील अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी संदीप मेटागळे यांच्यासह पंचायत समिती व संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यात सध्या १३ ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असून ५३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. भविष्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश आमदार खरात यांनी दिले.
Legislative election : बाजोरियांची नाराजी दूर होईल, राणा दाम्पत्य साथ सोडणार नाही
घाटबोरी, वरूड, नांद्रा धांडे यांसह काही गावांतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित गावांमध्ये तातडीने पाहणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित करणे किंवा टँकर सेवा सुरू करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, “मेहकर मतदारसंघातील एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून कोणत्याही गावात समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. निधी अथवा प्रशासकीय प्रक्रियेच्या कारणास्तव नागरिकांना त्रास होऊ दिला जाणार नाही.”
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची अडचण भासत असल्यास सरपंच, ग्रामसेवक किंवा संबंधित प्रशासनामार्फत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आवश्यक असल्यास आमदार कार्यालयालाही माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीत लवकरच संघटनात्मक पुनर्रचना; अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना पाणीटंचाईग्रस्त गावांवर सतत लक्ष ठेवण्याच्या, नागरिकांच्या तक्रारींना तत्पर प्रतिसाद देण्याच्या आणि समस्या गंभीर होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मेहकर व लोणार तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना उन्हाळ्यात दिलासा मिळावा, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.








