आर्णीच्या निकालाचा दाखला देत कळंबमध्येही उमेदवारीवर आक्षेप
Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्ष आता उमेदवारीच्या वैधतेवरून कायदेशीर वळण घेत आहे. आर्णी तालुका गटातील महायुतीचे उमेदवार अनिल आडे यांचा उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर बाद करण्याचे निर्देश देण्यात आले. या घडामोडीचा दाखला देत आता कळंब तालुका गटातील महायुतीचे उमेदवार प्रवीण देशमुख यांच्या उमेदवारीवर प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष जयस्वाल यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरशीला नवे वळण मिळाले असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदेशीर लढाईही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेच्या २३ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत तालुका गटातील १४ जागा, तर जिल्हा व राखीव गटातील नऊ जागांवर चुरस आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीपासूनच काही जागांवर आक्षेप आणि कायदेशीर आव्हानांचे सत्र सुरू झाले आहे.
आर्णी तालुका गटातील महायुतीचे उमेदवार अनिल आडे यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीच्या तृप्ती मनीष पाटील यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळल्यानंतर पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. सहकार कायद्यातील कलम ७३-कअच्या तरतुदींचा आधार घेत न्यायालयाने आडे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. हा आदेश बुधवारी समोर आल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींना वेग आला
रस्त्याचे काम बंद पडताच ग्रामस्थांचा संताप; अखेर आमदार आत्राम मैदानात!
आर्णीतील प्रकरणानंतर गुरुवारी कळंब तालुका गटात संतोष जयस्वाल यांनी महायुतीचे उमेदवार प्रवीण देशमुख यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला. जयस्वाल यांच्या तक्रारीनुसार, देशमुख हे कळंब येथील खरेदी-विक्री संस्थेचे संचालक आहेत. संबंधित संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकीदार असून, २०१६ पासून एक कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
सहकारी संस्थेच्या थकबाकीशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा आधार घेत हा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र, या तक्रारीतील दावे आणि त्यावरील अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे प्रवीण देशमुख यांच्या उमेदवारीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक जागेचे महत्त्व वाढले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष आता प्रचारापुरता मर्यादित न राहता उमेदवारीच्या वैधतेपर्यंत पोहोचला आहे. एका तालुका गटातील न्यायालयीन आदेशाचा आधार दुसऱ्या गटातील तक्रारीसाठी घेतला जात असल्याने निवडणुकीतील कायदेशीर घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुष्काळाच्या दाहकतेवर केंद्र सरकारच्या ‘फिल्ड’ पाहणीची फुंकर… निर्णयाकडे दुष्काळग्रस्तांची आस!
आता कळंबमधील तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, यावर पुढील राजकीय घडामोडींची दिशा अवलंबून असेल. मतदानाच्या तोंडावर उमेदवारीवरील आक्षेप आणि कायदेशीर तरतुदींची कसोटी यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.








