१० हजारांवर महिलांनी जनता दरबारात मांडल्या व्यथा; ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
Yavatmal : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो महिलांचा आर्थिक लाभ विविध कारणांमुळे बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोणतीही ठोस त्रुटी नसताना पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. बंद करण्यात आलेला लाभ तातडीने पूर्ववत करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन देण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेसच्या पुढाकारातून संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमातून महिलांच्या अडचणी आणि योजनेच्या लाभासंदर्भातील तक्रारी जाणून घेण्यात आल्या. या जनता दरबारात जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या समस्या मांडल्या. आधार कार्ड लिंक नसणे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणे, पात्रतेसंदर्भातील आक्षेप आणि बँक खात्यांमधील तांत्रिक अडचणी यांसह अनेक प्रश्न समोर आले.
तालुकानिहाय प्राप्त तक्रारींमध्ये यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक १,९८० तक्रारींची नोंद झाली. मारेगाव-झरी परिसरातून १,३४२, नेर-दरव्हा ९७३, उमरखेड ८५०, पुसद ८३५, महागाव ६७५, दिग्रस ६३५, केळापूर ६१३, आर्णी ५८७, घाटंजी ५६०, राळेगाव ५३२, कळंब ४९० आणि बाभूळगाव तालुक्यातून ४८० तक्रारी प्राप्त झाल्या. ई-केवायसी पूर्ण नसल्याचे कारण देत सुमारे ९५ टक्के महिलांचा लाभ थांबविण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, तर शेतमजुरांना २५ हजारांची मदत द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर पुन्हा सुविधा सुरू करावी, महिलांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, वयाची २१ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र महिलांना नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आदिवासी महिलांसह इतर पात्र लाभार्थ्यांचे बंद झालेले आर्थिक लाभही तातडीने सुरू करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शासनाने या प्रश्नावर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास ८ डिसेंबर रोजी जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नावरून आता जिल्ह्यात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
___








