पाच हजारांच्या मदतीवरून टीका; बचत गट आणि मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करण्याचीही मागणी
Yavatmal : दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची बोळवण करू नये. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सरकारच्या मदत धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेऊन रोहित पवार यांनी त्यांच्या अडचणी, आर्थिक परिस्थिती आणि जगण्याच्या संघर्षाची माहिती घेतली. शेतकरी आत्महत्येमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना केवळ सांत्वन देऊन चालणार नाही, तर त्यांना प्रत्यक्ष आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कुटुंबांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदाची दिवाळी घरी साजरी न करता शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसताना सण साजरा करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी केवळ मदतीच्या घोषणा करून उपयोग नाही, तर ती मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, खानगाव येथे ग्रामस्थांनी कापसाच्या बोंडांपासून तयार केलेला हार घालून रोहित पवार यांचे स्वागत केले. या अनोख्या स्वागतातून यंदाच्या हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि दुष्काळाची तीव्रता अधोरेखित झाली.
दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतमजूर आणि ग्रामीण महिलांनाही बसत आहे. बचत गट तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेल्या महिलांवरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी त्यांचे कर्ज माफ करावे. तसेच किमान दीड वर्ष कर्जवसुली थांबवावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस आर्थिक निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
____








