जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गावोगावी भेटीगाठींचा धडाका; अप्रत्यक्ष प्रचार सुरु
Washim : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी इच्छुकांनी साधली असून, शुभेच्छांच्या माध्यमातून जनसंपर्काचा धडाका सुरू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद, नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर दिला जात आहे. वर्षभर राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित असलेले काही चेहरेही आता सणाच्या निमित्ताने गावोगावी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल ग्रामीण राजकारणात स्पष्टपणे जाणवू लागली आहे.
दिवाळीनिमित्त गावागावांत इच्छुकांकडून शुभेच्छांचे फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी भेटवस्तूंचे वाटप, तर काही ठिकाणी कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. या भेटी केवळ सणाच्या शुभेच्छांपुरत्या मर्यादित नसून, त्यातून राजकीय संबंध दृढ करण्यासोबतच मतदारांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वडेट्टीवारांचा दिवाळी फराळातून गोडवा वाढविण्याचा प्रयत्न; काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण कायम!
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये आधीपासूनच स्पर्धा सुरू झाली आहे. कोणत्या गटातून निवडणूक लढवायची, पक्षातील वरिष्ठांशी संपर्क कसा वाढवायचा आणि मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची चाचपणीही सुरू असल्याचे चित्र आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी मर्यादित कालावधी मिळणार असल्याने इच्छुकांनी आतापासूनच जनसंपर्कावर भर दिल्याचे दिसते. दिवाळीच्या शुभेच्छांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही संधी राजकीय इच्छुकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या फटाक्यांसोबतच ग्रामीण राजकारणातही निवडणुकीच्या जनसंपर्काची आतषबाजी सुरू झाली आहे. आता या दिवाळीतील भेटीगाठींचे रूपांतर प्रत्यक्ष मतदानात कितपत होते, हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
____








