व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण वडेट्टीवारांचा दिवाळी फराळातून गोडवा वाढविण्याचा प्रयत्न; काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण कायम!

वडेट्टीवारांचा दिवाळी फराळातून गोडवा वाढविण्याचा प्रयत्न; काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण कायम!

 

गडचिरोलीतील स्नेहमिलनात कार्यकर्त्यांना सतर्कतेचा कानमंत्र; प्रमुख नेत्यांमधील दुरावा आणि अंतर्गत नाराजीवर मात्र मौन

 

Gadchiroli : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि संघटनात्मक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिवाळी स्नेहमिलनाच्या माध्यमातून पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ११ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित या कार्यक्रमातून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिवाळीच्या फराळातून राजकीय गोडवा वाढविण्याचा प्रयत्न झाला असला, तरी पक्षातील गटबाजीचे कटू वास्तव कायम असल्याचे चित्र दिसून आले.

कार्यक्रमात नेहमीप्रमाणे सत्कार, पुष्पगुच्छ आणि व्यासपीठावरील औपचारिक कार्यक्रमांना फाटा देत वडेट्टीवार यांनी सभास्थळी प्रवेश करताच थेट माइक हातात घेतला. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत भूमिका मांडली. भाजपसारख्या बलाढ्य राजकीय शक्तीविरोधात लढताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, डोळ्यांत तेल घालून काम करावे आणि प्रत्येक राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवावे, असा संदेश त्यांनी दिला.

मात्र, भाजपविरोधातील लढाईसाठी कार्यकर्त्यांना सतर्कतेचा सल्ला देणाऱ्या वडेट्टीवार यांनी पक्षांतर्गत मतभेदांवर भाष्य करणे टाळले. विशेष म्हणजे, या स्नेहमिलन कार्यक्रमाला शहरातील मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षातील सर्व गटांना एकत्र आणण्यात कितपत यश आले, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांची पुढील राजकीय खेळी काय? पाच विभागीय अध्यक्षांसह नऊ समित्यांच्या निवडीकडे लक्ष

 

माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा पक्षातील नेत्यांशी असलेला दुरावा, विश्वजित कोवासे यांच्यावर झालेली फौजदारी कारवाई आणि त्यानंतर पंकज गुड्डेवार यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी झालेली नियुक्ती, अशा अनेक घडामोडींमुळे जिल्हा काँग्रेसमधील राजकीय वातावरण चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष होते. मात्र, त्यांनी या विषयांना स्पर्श न करता कार्यकर्त्यांना भाजपविरोधातील लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

दरवर्षी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन आणि फराळाच्या माध्यमातून पक्षातील नेत्यांमध्ये संवाद व सलोखा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही वडेट्टीवारांनी तोच प्रयत्न केला. मात्र, केवळ स्नेहमिलन आणि फराळाने पक्षातील नाराजी दूर होणार का, सर्व गट एकाच व्यासपीठावर येणार का आणि जिल्हा काँग्रेसमधील मतभेदांवर तोडगा कधी निघणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

___

 

error: Content is protected !!