व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tcs nashik case : फरार निदा खानचा शोध सुरूच, लैंगिक शोषण व...

Tcs nashik case : फरार निदा खानचा शोध सुरूच, लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणाने संताप वाढला

tcs-nashik-molestation-conversion-case-nida-khan-investigation-update :   नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक दावे: अंतर्गत तक्रारच नाही म्हणत कंपनीचा बचाव

Mumbai : नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) युनिटमधील कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतरण प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत असून कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकरणात पोलिस तपास सुरू असतानाच कंपनीने कार्यालयीन अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडे एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा केल्याने संतापाची लाट उसळली आहे. वरिष्ठ पातळीवरच आरोपी असल्याचे आरोप असताना तक्रारी वरपर्यंत पोहोचल्या नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कंपनीकडून शुक्रवारी दिलेल्या निवेदनात अंतर्गत प्राथमिक तपासात एथिक्स आणि लैंगिक छळविरोधी पॉश यंत्रणेकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नसल्याचे म्हटले आहे. मात्र, याच मुद्द्यावरून कंपनीच्या यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात असून दबावाखाली कर्मचारी तक्रार करणार कसे, याचे समाधानकारक उत्तर व्यवस्थापनाकडे नसल्याची टीका होत आहे. पोलिसांनीही कंपनीच्या कार्यालयात जाऊन तपास केला असून प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे.

Women reservation : विरोधकांचा आक्षेप, परिसीमन व जातीय आरक्षणाच्या मागण्यांमुळे गणित बिघडलं

दरम्यान, वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने स्वतंत्र ओव्हरसाईट समिती स्थापन केली आहे. स्वतंत्र संचालक आणि ज्येष्ठ वित्तीय तज्ज्ञ केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असून प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जात आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी आर्थी सुब्रमण्यम या देखील तपास प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय डेलॉयट आणि टायलीगल या बाह्य सल्लागार संस्थांची नियुक्ती करून प्रकरणाची सर्वंकष चौकशी केली जात आहे. तरीही प्राथमिक टप्प्यातच कंपनीने घाईघाईने स्पष्टीकरण दिल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित निदा एजाज खान ही गेल्या काही दिवसांपासून फरार असून तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक गुन्हे शाखेने ठाण्यातील मुंब्रा परिसरात छापेमारी करत तिचा पती मोईन खान याला ताब्यात घेत चौकशी केली आहे. चौकशीत निदा खान काही दिवस मुंब्र्यातच वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली, मात्र तपास पथक पोहोचण्याआधीच ती ठिकाण बदलून निघून गेल्याचे स्पष्ट झाले. पथकाने साध्या वेशात रेकी करत कारवाई केली असून तिचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

निदा खान ही वयाच्या २६व्या वर्षी कंपनीत टीम लीडर पदावर कार्यरत होती आणि नवीन महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेत तिची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात उघड झाले आहे. २०२१ पासून कंपनीत कार्यरत असलेल्या निदा खानवर महिला कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढून कथित धर्मांतरण आणि शोषणाच्या रचनेत सहभागी असल्याचे आरोप आहेत. आर्थिक मदत आणि नेटवर्कच्या माध्यमातून या कारवाया राबवल्या जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Navneet Rana vs Pyare khan : अचलपूर प्रकरणात लॅपटॉप जप्त झाल्यावरच बोलेन; नवनीत राणा यांचा प्यारे खान यांना इशारा

दरम्यान, कंपनीने निदा खानला सेवेतून कमी केल्याची नोटीस दिली असून तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तिची अटक झाल्यास या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संभाव्य मोठ्या नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाचे पथकही नाशिकमध्ये दाखल होणार असून घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून घेण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती घेत तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!