महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढतीत अपक्षांचे आव्हान
Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर २३ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने बहुतांश गटांमध्ये आपापले उमेदवार मैदानात उतरवले असून, काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही आव्हान उभे केले आहे. त्यामुळे तालुका गटांसह जिल्हा व राखीव गटांतील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल १२३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर दिग्रस आणि पुसद तालुका गटातील जागा बिनविरोध झाल्या. दिग्रस तालुका गटातून खासदार संजय देशमुख यांची, तर पुसद तालुका गटातून विजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने दोन्ही जागांवरील निवडणूक टळली.
मारेगाव तालुका गटात उद्धवसेनेकडून किरण देरकर आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सारंग ठाकरे यांच्यात लढत होणार आहे. वणीमध्ये काँग्रेसचे टीकाराम कोंगरे, भाजपचे दीपक मत्ते आणि सुनील कातकडे यांच्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र आहे. उमरखेडसह इतर तालुका गटांमध्येही आघाडी आणि युतीच्या उमेदवारांसमोर अपक्षांनी आव्हान उभे केले आहे.
जिल्हा गटात महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष अशा तिन्ही बाजूंनी उमेदवार मैदानात असल्याने या गटातील चुरस वाढली आहे. पोपेश्वर भोयर, देविदास चवरे, देविदास देशमुख, नाना गाडबैले, विराज घुईखेडकर, प्रशांत गोहोकार, राजूदास जाधव, अरविंद वाढोणकर यांच्यासह अजिंक्य माहुरे, मंगेश राऊत आणि नटवरलाल उंटवाल हे उमेदवार जिल्हा गटातून रिंगणात आहेत.
अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला राखीव गटातही आघाडी, युती तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे केवळ पक्षीय समीकरणांपेक्षा स्थानिक पातळीवरील सहकार क्षेत्रातील संबंध आणि मतदारसंघनिहाय राजकीय गणिते महत्त्वाची ठरणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी निश्चित करताना महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत जागावाटपावर चर्चा सुरू होती. काही इच्छुकांची तालुका गटातून जिल्हा गटात, तर काहींची जिल्हा गटातून तालुका गटात वर्णी लावण्यात आली. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.
हजारो कोटींच्या जाहिराती, पण ११ चिमुकल्यांसाठी सुरक्षित वाहन नाही!
आता बिनविरोध झालेल्या जागा वगळता उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचाराची दिशा, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका यावर निवडणुकीची पुढील रंगत अवलंबून राहणार आहे.








