Health services collapse in 25 villeges : शासनाचा बेजबाबदार कारभार; प्राथमिक आरोग्य केंद्र बंद
Gondia तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. शासनाच्या निष्काळजी आणि बेफिकीर धोरणामुळे परिसरातील सुमारे २५ गावांतील हजारो नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित झाले आहेत. आरोग्य ही मूलभूत गरज असताना देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, सरकारची ही भूमिका संतापजनक आणि निष्काळजीपणाची ठरते.
वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे करत आरोग्य विभागाने केंद्र बंद केले. मात्र, पर्यायी व्यवस्था उपलब्ध न करता केंद्र थेट बंद ठेवण्यात आले. परिणामी या भागातील नागरिकांना तब्बल १२ किलोमीटर अंतरावरील तिरोडा येथे उपचारासाठी जावे लागत आहे. हे केवळ वेळ आणि पैशाचे नुकसान नसून, अनेक वेळा रुग्णांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. प्रसूतीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तर या सेवांचा अभाव जीवघेणा ठरू शकतो.
Vanchit bahujan aaghadi : आंबेडकर म्हणाले, एकत्र लढलो तरच फायदा
या सर्व प्रकाराकडे शासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे जनतेत तीव्र असंतोष आहे. मंगळवारी (दि. १५) वडेगाव येथे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी भेट देऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि शासनाच्या या बेपर्वाईचा तीव्र निषेध केला.
“आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष करून जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे. वडेगावसारख्या मोठ्या भागात आरोग्य केंद्र बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. मी स्वतः आरोग्य विभागाशी संपर्क साधून हे केंद्र तातडीने सुरू होईल याची खबरदारी घेणार आहे,” असे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी ठामपणे सांगितले.
माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, “शासन जर या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार नसेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. आरोग्य सेवा बंद ठेवून शासन जनतेच्या जीवाशी खेळत आहे. आम्ही केंद्र सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवू, आणि गरज भासल्यास तीव्र आंदोलनही छेडू.”
या प्रकरणात विशेष म्हणजे सहा महिने उलटून गेले तरीही ना नवीन जागेची व्यवस्था करण्यात आली, ना तात्पुरती सेवा सुरू करण्यात आली. शासनाच्या तिजोरीत विकासासाठी निधी आहे, पण गरजू जनतेच्या आरोग्यासाठी काहीच नाही, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
Harshawardhan Deshmukh : मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन!
वडेगाव परिसरातील नागरिकांनीही शासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला असून, तातडीने आरोग्य केंद्र सुरू न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. आरोग्य सुविधा हा हक्क असून, शासनाचा हा बेफिकीरपणा माफ केला जाणार नाही, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे.