Prime Minister presents ‘Special Panchayat Award for Climate Action’ : ‘हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार प्रदान
Gondia गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीने आपल्या नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर डंका वाजवला आहे. ‘राष्ट्रीय पंचायतराज दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार २०२३-२४’ या सन्मानाने डव्वा ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कारासोबत १ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. बिहार राज्यातील मधुबनी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात ही घोषणा झाली. राज्यातील एकमेव आणि देशातील अव्वल ठरलेली ही ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.
डव्वा ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने घेतलेल्या पुढाकारामुळे हवामान बदलावर प्रभावी पावले उचलण्यात आली. गावात सौरऊर्जेचा शंभर टक्के वापर, प्लास्टिक व फटाक्यांवर बंदी, तसेच जैवविविधता जपणारे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले. यामुळे गावाचा कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
गावात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांचे संवर्धन करण्यावर विशेष भर देण्यात आला. शाश्वत विकास आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने राबवले गेलेले उपक्रम हे इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरणारे आहेत.
या यशामागे सरपंच योगेश्वरी चौधरी, ग्रामसेविका सिंधू सूर्यवंशी, तसेच गावकऱ्यांची एकजूट महत्वाची ठरली. गावकऱ्यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. प्रत्येक उपक्रमात शंभर टक्के सहभाग मिळवत गावाने एक आदर्श निर्माण केला.
डव्वा गावातील कार्यपद्धती आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती मिळाल्यानंतर भारत सरकारच्या विशेष पथकाने गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतरच या गावाच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आले.
Uddhav Balasaheb Thackrey Shivsena : ठाकरे गटाचा एल्गार; २ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा!
सामान्य गाव असामान्य कामगिरी करू शकते, हे डव्वा ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या, विशेषतः विदर्भाच्या दृष्टीने ही बाब गौरवास्पद असून, अन्य ग्रामपंचायतींनाही पर्यावरणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारी आहे. डव्वा ग्रामपंचायत आता देशाच्या आदर्श पंचायतांमध्ये गणली जात आहे!