Shiv Sena’s tractor march to the Collector office : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मैदानात; सरकारवविरुद्ध रोष
Akola विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली कर्जमाफीची आश्वासने पूर्ण न करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शुक्रवारी (२ मे) जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
क्रिकेट क्लब मैदानावरून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेनेचे उपनेते नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात टॉवर चौक, पंचायत समिती मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी निवेदन सादर करण्यात आले.
मोर्च्यापूर्वी आमदार नितीन देशमुख व जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्ह्यातील सुमारे ७०० गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते.
अमरावती येथे झालेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेना संपर्कप्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये २ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अकोल्यातही हा मोर्चा आयोजित करण्यात आला.
Bacchu kadu, Ravi Rana : लठधारी आमदार ‘पोस्टर’द्वारे बच्चू कडूंना डिचवले!
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.
कर्जमाफीसारख्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने रस्त्यावर उतरून शासनाचा जाब विचारला असून, लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या मोर्चातून देण्यात आला आहे.