व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र आष्टीच्या अप्पर तालुका कार्यालयाचा प्रश्न ऐरणीवर; सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून लढा!

आष्टीच्या अप्पर तालुका कार्यालयाचा प्रश्न ऐरणीवर; सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून लढा!

प्रस्तावित यादीतून नाव वगळल्याने नाराजी; प्रशासकीय सोयीसाठी समावेशाची मागणी

 

Gadchiroli: आष्टी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय गरजा, भौगोलिक परिस्थिती आणि आष्टीचे महत्त्व लक्षात घेता येथे अप्पर तालुका कार्यालयाची स्थापना होणे आवश्यक असताना शासनाच्या प्रस्तावित यादीतून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. हा केवळ एखाद्या गावाच्या नावाचा विषय नसून, परिसरातील अनेक गावांच्या प्रशासकीय सोयी आणि विकासाशी निगडित असल्याने आष्टीचा समावेश प्रस्तावित यादीत करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

या मागणीसाठी आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या वतीने चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते. आष्टीचा प्रस्तावित यादीत समावेश का आवश्यक आहे, याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर भूमिका मांडली.

आष्टी हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिकांना शासकीय कामांसाठी आष्टीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, विविध प्रशासकीय कामांसाठी दूरच्या कार्यालयांमध्ये जावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. अप्पर तालुका कार्यालयाची स्थापना झाल्यास महसूलविषयक कामांसह इतर प्रशासकीय सेवांसाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होईल. तसेच स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत मिळेल.

 

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना रकान्यासाठी लढा तीव्र करणार; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

 

 

आष्टीचे भौगोलिक स्थान, परिसरातील गावांची संख्या, लोकसंख्येची गरज आणि दळणवळणाच्या उपलब्ध सुविधा या निकषांचा विचार करून शासनाने प्रस्तावित यादीत आष्टीचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रश्नाला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेण्याची भूमिका सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आष्टीला अप्पर तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही मागणी केवळ निवेदनापुरती मर्यादित न ठेवता शासनदरबारी सातत्याने मांडण्याचा निर्धार व्यक्त होत आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटी बुर्ते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष डॉ. हेमंत भाकरे, पुष्पा बुर्ले, दिलीप बारसागडे, संजय पंदिलवार, बेबी बुरांडे, विठ्ठल आचेवार, दीपक रॉय यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आष्टीच्या अप्पर तालुका कार्यालयाचा प्रश्न आता सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पुढे येत असल्याने शासन या मागणीची दखल घेऊन प्रस्तावित यादीत फेरबदल करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

____

 

error: Content is protected !!