Highway works will be inspected : गडकरींचा अकोला दौरा मंगळवारी, महामार्गाच्या कामांची करणार पाहणी
Akola केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मंगळवारी (६ मे) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ व अकोला बायपासच्या कामांची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेली महामार्ग कामे गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गडकरी यांचे नागपूर येथून सकाळी ८.१० वाजता विशेष विमानाने अकोला विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते थेट बाळापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग कामाची पाहणी करण्यासाठी पोहचणार असून, तेथे दुपारी १२.३० पर्यंत विश्रांतीसाठी राखीव वेळ आहे.
दुपारी १२.३० वाजता केंद्रीय मंत्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ या महत्त्वाच्या मार्गाची पाहणी करणार आहेत. या मार्गात अमरावती– अकोला – खामगाव हा प्रमुख टप्पा असून, याशिवाय अकोला शहराला वळसा घालणाऱ्या बायपास रस्त्याचाही समावेश आहे. नागरिक आणि वाहनचालकांच्या दृष्टीने या मार्गांचं काम अत्यंत महत्त्वाचं असून, अपूर्ण कामांमुळे अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून होत आहेत.
दुपारी १ वाजता गडकरी अकोला विमानतळावर परत येणार आहेत. तेथून विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना होतील. गडकरी यांच्या या दौऱ्याकडे स्थानिक जनतेसह प्रशासकीय यंत्रणेचंही लक्ष लागलं आहे. खासकरून राष्ट्रीय महामार्गांच्या कामांतील विलंब, गुणवत्तेच्या तक्रारी, वळणरस्त्याच्या अडचणी यावर केंद्रीय मंत्री काही निर्णय घेतात का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान संबंधित केंद्रीय व राज्य पातळीवरील अभियंते, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती अपेक्षित आहे. विशेषत: अकोला शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बायपास रस्त्याचं काम किती लवकर पूर्ण होतं, हे महत्त्वाचं ठरणार आहे. या दौऱ्यामुळे अकोल्यातील रस्ते आणि वाहतूक समस्यांवर काही सकारात्मक पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.