Will uncle and nephew come together? Only Sharad Pawar can tell this said Anil Deshmukh : शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण
Nagpur : आमच्या पक्षातील एका गटाला असं वाटतंय की, त्यांनी अजित पवारांसोबत जावं, असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (८ मे) केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना विचारले आसता, शरद पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे, ते स्वतः तेच सांगू शकतील, असे ते म्हणाले. काही कार्यकर्त्यांनी तसं वक्तव्य केल्यामुळे शरद पवार तसं बोलले असतील, असेही देशमुख यांनी सांगितले.
शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपरोक्त वक्तव्य केलं. त्यानंतर अनिल देशमुख यांना विचारले असता, शरद पवारांच्या मनात काय आणि त्यांना काय सांगायचं आहे, हे केवळ तेच सांगू शकतात, असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता, आम्ही आमच्या पक्षाची संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहो, असे ते म्हणाले.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काय झालं, हे सर्वांनाच माहिती आहे. ईव्हीएममध्ये गडबड झाली. मतदार याद्यांमध्ये गडबड झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या विरोधात लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला पक्ष कशा पद्धतीने मजबुतीने पुढे नेता येईल, यासाठी सर्वच स्तरांवर आम्ही काम करतो आहोत, असे अनिल देशमुख म्हणाले.