पदवीधर निवडणुकीत नियोजन करूनही अपयश आल्याची खंत
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, राज्याचे महसूलमंत्री तथा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, पराभवाबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सखोल आत्मचिंतन करून चुका सुधारणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्षाने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. जातीय व राजकीय गणिते आणि मतदारसंघातील विविध शक्यतांचा विचार करून पक्षाने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना रिंगणात उतरवले होते. पक्षाची संपूर्ण ताकद, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचले होते. मात्र, तरीही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.
निकालानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पराभवाला जबाबदार कोण, कोणी घात केला का, यावरून चर्चा रंगल्या असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी समोर येत वस्तुस्थिती स्पष्ट केली. या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत होतो. त्यामुळे या पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नागपूर आणि पुणे हे दोन्ही पदवीधर मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे होते. हे दोन्ही मतदारसंघ पक्षाकडे यावेत यासाठी आम्ही व्यापक नियोजन केले होते. कार्यकर्त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. परंतु, एवढे प्रयत्न करूनही विजय मिळाला नाही, याचा अर्थ नक्कीच कुठेतरी उणिवा राहिल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, हा निकाल पक्षासाठी आत्मपरीक्षण करण्याची मोठी संधी आहे. निवडणुकीत जय आणि पराभव होतच असतात, परंतु पराभवाची कारणे शोधल्याशिवाय पुढे जाणे योग्य ठरणार नाही. कोणत्या मतदारसंघात मतदानाचा कल काय होता, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला आणि संघटनस्तरावर कुठे सुधारणेची गरज आहे, याचा सखोल अभ्यास केला जाईल. अनुभवातून शिकून आणि या चिंतनातून चुका सुधारत, आगामी काळात नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची जागा पुन्हा भाजपच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.








