महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल, शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना
Nagpur शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मयतालासुद्धा जाऊ नका, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या गायकवाड यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे.
शेतकऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींची जीभच छाटली पाहिजे, असा संतापजनक रोष व्यक्त करत वडेट्टीवारांनी महायुती सरकारला धारेवर धरले.
मुंबईतील आमदार निवासाच्या कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण करून चर्चेत आलेले आमदार संजय गायकवाड यांनी आता थेट अन्नदात्याचाच अपमान केला आहे.
भाजपचा ‘दोन नंबरचा शत्रू’ कोण? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवामागील षढयंत्राचा शोध सुरू
महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी संकटात सापडून आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे राज्यभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, पुढील वर्षाच्या जूनपर्यंत पाणी जपून वापरणे गरजेचे असताना सरकार मात्र पाणी वापरणाऱ्या मोठ्या उद्योगांना सर्रास परवानग्या देत आहे. शेतकरी, सामान्य जनता, विद्यार्थी आणि ओबीसी समाजाचे प्रश्न बिकट झाले असताना सरकारचे लक्ष मात्र केवळ सत्तेतील कुरघोड्यांकडेच असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला.
गडचिरोली जिल्हा परिषदेत ७८ टक्के आरक्षण; ओबीसींच्या जागांवर टांगती तलवार!
शेतकऱ्यांच्या दुःखावर मलम चोळण्याऐवजी सत्ताधारी आमदार त्यांची उघडपणे हेटाळणी करत आहेत. एवढे होऊनही त्यांच्यावर सरकारकडून कसलीही कारवाई का केली जात नाही? संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहमत आहेत का, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वारंवार अशी बेजबाबदार विधाने करणाऱ्या गायकवाड यांना पक्षातून तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा आमदारावर कारवाई झाली नाही, तर येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरू आणि सरकारला उत्तर देण्यास भाग पाडू, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. दरम्यान, या चौफेर टीकेनंतर आमदार गायकवाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ते प्रसारित केले गेले, असा दावा करत सारवासारव सुरू केली आहे.








