व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण सक्तीची मतदार नोंदणी आणि अंतर्गत दुर्लक्ष भाजपला पडले महागात, ‘टार्गेट’ पूर्ण करण्याच्या...

सक्तीची मतदार नोंदणी आणि अंतर्गत दुर्लक्ष भाजपला पडले महागात, ‘टार्गेट’ पूर्ण करण्याच्या नादात परक्यांना जवळ केले

विद्यापीठातील मुरब्बी नेत्यांना पदवीधरच्या निवडणुकीपासून ठेवले लांब

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पराभवानंतर पक्षांतर्गत धोरणांवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महापालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांवर लादलेली ‘सक्तीची मतदार नोंदणी’ आणि त्यात झालेला सावळागोळाच कोहळे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. आपले कोण आणि परके कोण, याचा विसर पडल्याने निवडणुकीत मोठा घात झाल्याची चर्चा आता पक्षात रंगली आहे.

पदवीधर निवडणूक जवळ येताच भाजप नेत्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापासून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत सर्वच प्रमुख नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट हवे असेल, तर पदवीधर मतदारांची नोंदणी करावीच लागेल, असा कडक नियम केला होता. प्रत्येक कार्यकर्त्याला एक हजार पदवीधरांच्या नोंदणीचे ‘टार्गेट’ देण्यात आले होते.

या दडपणाखाली आणि केवळ टार्गेटमधून सुटका करून घेण्यासाठी अनेकांनी मिळेल त्या पदवीधरांचे अर्ज भरून घेतले. नेत्यांनी आम्ही सर्वाधिक नोंदणी केली, त्यामुळे आपला विजय निश्चित, अशी फुशारकी मारली; मात्र ही नोंदणी करताना आपले कोण आणि परके कोण, याचे भान ठेवले गेले नाही. कागदावर आकडा फुगला असला, तरी या भरतीमुळे अनेक मतदारांनी पहिल्या पसंतीचे मत काँग्रेस वा अन्य उमेदवारांना दिले, ज्यामुळे महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. याउलट, वंजारी यांनी शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांना हाताशी धरून मोजकी आणि खात्रीशीर मते जोडण्याचे अचूक राजकीय धोरण राबवले.

आमदार गायकवाडांची जीभच छाटली पाहिजे! विजय वडेट्टीवारांचा संताप

या पराभवामागे केवळ सक्तीच नव्हे, तर पक्षातील अंतर्गत निर्णयप्रक्रियाही तितकीच कारणीभूत ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी आमदार अनिल सोले यांसारख्या नेत्यांनी यापूर्वी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपडे विद्यापीठाच्या राजकारणात मुरलेली मुरब्बी नेत्यांची तगडी फळी उपलब्ध होती.

भाजपचा ‘दोन नंबरचा शत्रू’ कोण? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवामागील षढयंत्राचा शोध सुरू

मात्र, काही मोजक्या नेत्यांनी कोहळे यांची उमेदवारी आधीच निश्चित करून ठेवली होती. या जागेवर कुणी दुसरा दावा करू नये, म्हणून विद्यापीठ व शैक्षणिक क्षेत्रात वावरणारे अनुभवी कार्यकर्ते व नेत्यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून पद्धतशीरपणे लांब ठेवण्यात आले. त्यांचा सल्ला किंवा मदत न घेण्याचा हा अहंकार आणि अतिआत्मविश्वास भाजपला अखेर नडला. २ लाख ५५ हजार नोंदणीकृत आणि १ लाख ६५ हजार मतदान झालेल्या या निवडणुकीत, ८० हजार मतांनी विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला पहिल्या पसंतीचा कोटाही गाठता आला नाही. कोहळे यांना ६३ हजार ९६० तर वंजारी यांना ६७ हजार २३१ मते मिळाली. अतिउत्साहात लादलेली सक्ती आणि अनुभवी नेत्यांना डावलण्याची रणनीती भाजपला पदवीधरच्या गडातच भारी पडल्याचे या पराभवाने सिद्ध केले आहे.

error: Content is protected !!