कोहळेंच्या पराभवात निर्णायक भूमिका, आता विधानसभेची तयारी
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अनपेक्षित आणि भरगोस मते घेऊन भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावणारे नितेश कराळे गुरुजी एकदम फुल्ल जोशात आले आहेत. या निवडणुकीतील वादळी कामगिरीनंतर त्यांनी आपले पुढचे राजकीय टार्गेट फिक्स केले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना उघड आव्हान देत, त्यांच्याविरोधात वर्धा विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा कराळे गुरुजींनी केली आहे.
आपल्या आगळ्यावेगळ्या वऱ्हाडी शैलीमुळे आणि सोशल मीडियावर ‘जेन-झी’ मध्ये तुफान लोकप्रिय असलेल्या कराळे गुरुजींनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीची तयारी केली होती. महाविकास आघाडीकडून अभिजित वंजारी यांची उमेदवारी निश्चित असताना, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव असणाऱ्या कराळे गुरुजींनी बंडखोरी करत आपली दावेदारी ठोकली. पक्षाने माघार न घेतल्याने मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले, तरीही गुरुजी निवडणुकीच्या मैदानात ठाम राहिले.
काँग्रेस आणि भाजप दोघांनीही सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, निकाल आला अन् सर्वांचेच डोळे पांढरे झाले. कोणत्याही पक्षाचे पाठबळ, कार्यकर्ते किंवा आर्थिक रसद नसताना कराळे गुरुजींनी तब्बल २४ हजार मतांचा टप्पा गाठला. कोहळे आणि वंजारी दोघांनाही पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता न आल्याने निकालाचे पारडे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेले. तिथेच भाजपविरोधी ठरलेल्या कराळे गुरुजींच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी वंजारींचा विजय सुकर केला आणि कोहळे यांच्या आघाडीचा ग्राफ क्षणात खाली आणला.
निकालानंतर कराळे गुरुजींनी वंजारींना उद्देशून तुम्हारे जीत से ज्यादा हमारी हार की चर्चा जादा है” असा टोला लगावत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.
नागपूरचा निकाल लागताच वर्धेत पोहचलेल्या गुरुजींनी थेट भाजपचे स्थानिक आमदार आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याचे रणशिंग फुकले आहे.
आमदार गायकवाडांची जीभच छाटली पाहिजे! विजय वडेट्टीवारांचा संताप
सध्या कुठल्याही पक्षात नसलेल्या गुरुजींच्या या अनपेक्षित ताकदीमुळे त्यांना अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, त्यांचे निलंबन मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) त्यांच्यासाठी पुन्हा दरवाजे उघडे करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कुणाचेही पाठबळ आणि आर्थिक रसद नसताना स्वबळावर गुरुजींनी मारलेली ही मुसंडी सध्या विदर्भाच्या राजकारणात चांगलीच तापली आहे.








