Committed to bringing Pardhi society into the mainstream : पालकमंत्र्यांचा शब्द; पारधी पॅकेज अंतर्गत शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना वाटप
Amravati पारधी समाज आजही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शनिवारी जिल्हा नियोजन सभागृहात धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने पारधी पॅकेज अंतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल, घरपट्टे, ट्रॅक्टर, ई-रिक्षा आदींचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी प्रिया म्हाडदळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, “पारधी समाजाला प्राधान्याने घरकुल योजना, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम शासन करीत आहे. पारधी विकास कार्यक्रमांतर्गत विशेष भर रोजगार निर्मितीवर आहे. समाजात प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी उपक्रम राबवले जातील.”
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. या माध्यमातून प्रत्येक समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण होणार असून, वस्तुस्थिती लक्षात घेऊन विकास धोरण ठरवले जाणार आहे.
Chandrashekhar Bawankule : नेत्यांच्या मागे फिरून तिकीट मिळणार नाही
कार्यक्रमात पूजा सोळंके, वर्षा पवार, पंडित चव्हाण तसेच शिवशक्ती महिला बचतगट यांना प्रतीकात्मक लाभ प्रदान करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टर व ई-रिक्षा वाटप करून लाभार्थ्यांशी संवाद साधला.