१५० एकरांत उभारणार आधुनिक केंद्र, शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, रोजगारनिर्मितीवर
Wardha: विदर्भाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने सिंदी (रेल्वे) येथे उभारण्यात येणारा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केवळ मालवाहतुकीची सुविधा म्हणून नव्हे, तर विदर्भातील कृषी उत्पादन, उद्योग आणि निर्यात व्यापाराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारे केंद्र म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ आणि वाहतूक खर्चात कपात करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
सिंदी (रेल्वे) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएमएल) या विशेष उद्देश वाहनाच्या माध्यमातून अमारा ट्रान्झ सोल्युशन कंपनीकडून हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. नुकतेच प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी गडकरी यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भाच्या व्यापार व्यवस्थेत होणाऱ्या संभाव्य बदलांवर प्रकाश टाकला.
नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे १५० एकर क्षेत्रात विकसित होणाऱ्या या प्रकल्पाला सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टशी जोडण्यात येणार आहे. कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, कंटेनर हाताळणी आणि सीमाशुल्क कार्यालय अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. निर्यातदारांसाठी स्वतंत्र क्लस्टर विकसित केल्यास विविध उद्योगांना एकाच ठिकाणी आवश्यक लॉजिस्टिक्स सुविधा मिळू शकतील.
आष्टीच्या अप्पर तालुका कार्यालयाचा प्रश्न ऐरणीवर; सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून लढा!
विदर्भातील कापूस, कापसाची रुई, सूत, कापड, संत्री आणि भाजीपाला यांसारख्या उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या मुंबईमार्गे होणाऱ्या वाहतुकीऐवजी काही माल कोलकात्याच्या हल्दिया बंदराच्या माध्यमातून थेट बांगलादेशकडे पाठविण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रति कंटेनर सुमारे दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च एक लाख रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा गडकरी यांनी केला.
मुंबई-कोलंबो-ढाका मार्गावरील वाहतुकीचा वेळ वाचविण्यासह जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय निर्यातीला प्रोत्साहन देण्याचेही उद्दिष्ट आहे. या प्रकल्पातून मारुती मोटारींची पहिली रॅक सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
या प्रकल्पामुळे नागपूर आणि वर्धा परिसरातील मोठ्या उद्योगांना एकत्रित लॉजिस्टिक्स व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रकल्पाचा व्यापक परिणाम प्रत्यक्षात दिसण्यासाठी स्थानिक तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना वाहतूक सवलती आणि लघुउद्योगांना निर्यात प्रक्रियेत सहभागाच्या संधी मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना रकान्यासाठी लढा तीव्र करणार; विजय वडेट्टीवार यांची घोषणा
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी., माजी खासदार रामदास तडस आणि सिंदीच्या नगराध्यक्षा राणी कलोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सिंदी रेल्वेचा हा प्रकल्प विदर्भाला केवळ वाहतुकीच्या नकाशावर स्थान मिळवून देणारा न राहता कृषी, उद्योग आणि निर्यात यांना जोडणारा विकासाचा नवा दुवा ठरणार का, हे त्याच्या अंमलबजावणीवर आणि स्थानिकांना मिळणाऱ्या प्रत्यक्ष लाभांवर अवलंबून असेल.








